Ahmednagar News : मागील आठवड्यात जिल्हाभर पडलेल्या संततधार पावसामुळे कपाशीची पातेगळ होऊन मोठे नुकसान झाले आहे. तर बाजरी,सोयाबीन, मूग तसेच उडदाचे देखील मोठे नुकसान झाले आहे. मात्र त्यानंतर असलेल्या ढगाळ वातावरणामुळे कपाशीवर मावा, तुडतुडे व बुरशीजन्य रोगाचा प्रादूर्भाव झाल्याने कपाशी पीक देखील हातचे जाण्याचा धोका असल्याने शेतकरी वर्ग चिंताग्रत झाला आहे.
मागील आठवड्यात पावसाने जिल्ह्यात सलग चार ते पाच दिवस पावसाने दमदार हजेरी लावली. त्यामुळे शेतात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने खरिपाचे मोठे नुकसान झाले असून, जास्त काळ पाणी साचून राहिल्याने जमिनीत ओल कायम असल्याने कपाशी पिकाची पातेगळ सुरू झाली आहे.
सततच्या पावसामुळे कपाशीच्या झाडांचे खालील बोंडे काळी तर पाने लालसर व पिवळी पडली असून गळ सुरू आहे. तर खोलगट भागात कपाशीची झाडे मर रोगामुळे कोमेजली आहे. अनेक भागात तर मोठ्या प्रमाणात कपाशी अचानक सुकू लागल्याने शेतकऱ्यांपुढे मोठे संकट उभे राहिले आहे.
सध्या अनेक भागात खरिपातील बाजरी, मूग, मठ, उडीद आदी पिकांचा सुगीचा हंगाम सुरू असून सोंगणी केलेल्या बाजरीच्या पाणी लागल्याने कणसाला अंकूर फुटले आहे. काही शेतकऱ्यांनी सोंगणी केलेली बाजरीचे कणसे शेतात झाकून ठेवली होती.
मात्र सतत पडत असलेल्या पावसामुळे या कणसात पाणी शिरल्याने ओली होऊन आता या कणसांनाच अंकुर फुटले आहेत, त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. तर मुग, मठ, उडिद, चवळी या पिकांच्या शेंगातून मोड बाहेर आल्याने मोठा आर्थिक फटका शेतकऱ्यांना बसला आहे. या पावसामुळे सोयाबिनचेही मोठे नुकसान झाले आहे.
दरम्यान, या वर्षी खरिप हंगाम सुरू झाल्यावर पावसाने बळीराजावर चांगली कृपा केली होती. जून महिन्यात पावसाने चांगली सुरूवात केल्याने शेतकरी वर्ग समाधानी होता.
आर्थिक परिस्थिती नसताना देखील महागडे बियाणे, खते खरेदी करून पिके जोमदार आणली. वेळोवेळी वरूणराजाने ही त्याला चांगली साथ दिली. गेल्या अनेक वर्षापासून तोट्यात चाललेली शेती या वर्षी चांगले उत्पन्न देणार म्हणून शेतकरी आनंदात होता. मात्र, या संततधार पावसामुळे त्याच्या आनंदावर काही प्रमाणात विरजन पडल्याचे दिसते.