१३ जानेवारी २०२५ निघोज : कुकडीचे पाणी पठारावर आणण्यासाठी गेल्या ५० वर्षांपासून प्रयत्न करणाऱ्या पारनेर तालुक्यातील पठार भागातील दुष्काळी पट्ट्यातील शेतकऱ्यांनी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना निवेदनाद्वारे साकडे घातले आहे.कान्हूर पठार परिसराला कायम पाण्याचे दुर्भिक्ष्य असल्याने सातत्याने दुष्काळी परिस्थिती असते.
उन्हाळ्यात राज्य सरकार टँकरच्या माध्यमातून पिण्याचे पाणी उपलब्ध करून देते.त्यासाठी आज अखेर शासनाने कोट्यवधींचा निधी खर्च केला जातो.मागील ५० वर्षांपासून ही मागणी होत आहे.कुकडीच्या डिटेल प्रोजेक्ट रिपोर्टमध्ये १९६६ साली उपसा सिंचन क्षेत्राचा समावेश केला आहे.
त्यामुळे कान्हर पठारावरील ग्रामस्थांनी केलेली मागणी न्याय व हक्काची आहे.रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन झाल्याबद्दल दिवंगत माजी मंत्री शंकरराव काळे यांचा तत्कालिन आ.भास्करराव औटी यांच्या हस्ते कान्हुर पठार येथे सत्कार केला होता.त्यावेळी प्रथमच त्यांच्याकडे पठार भागाला पाणी मिळावे,अशी मागणी करण्यात आली.
त्यानंतर दिवंगत केंद्रीय मंत्री व माजी खा. बाळासाहेब विखे पाटील व माजी पाटबंधारे मंत्री बी. जी. खताळ यांच्या उपस्थितीत कान्हर पठारच्या विठ्ठल मंदिरात दुष्काळ पाणी परिषद पार पडली,त्यावेळी ही पाण्याची मागणी लावून परण्यात आली.१९७८ साली ५० गावांचा समावेश असलेल्या सर्वपक्षीय कुकडी पाणी समिती स्थापन झाली.
पठार भागाला कायमस्वरूपी पाणी मिळावे,यासाठी पारनेर तहसील कार्यालयावर ५ हजारपिक्षा जास्त नागरिकांचा मोर्चा काढण्यात आला, दिवंगत वसंत दादा पाटील मुख्यमंत्री असताना दिवंगत माजी आ. कॉग्रेड बाबासाहेव दुबे यांच्या अध्यक्षतेखाली व माजी मंत्री शंकरराव काळे यांच्या प्रमुख उपस्थिती मंत्रालयावरही मोर्चा निघाला.
गेल्या ५० वर्षांत पठार भागाच्या पाण्याची मागणी व्यवस्थित पाठपुरावा न झाल्याने पूर्णत्वास जाऊ शकली नाही.शेतीच्या पाण्याबरोबरच १६ गावे पाणी योजनासुद्धा पूर्ण झाली नाही.एप्रिल १९९५ च्या पहिल्या आठवड्यापासून ते आजतागायत उन्हाळा सुरू झाला की, टँकर चालू होतात. टँकरचा खर्च लक्षात घेतला, तर उपसा सिंचन योजना झाली असती.पाण्याच्या दुर्भिक्ष्यामुळे शेतीपूरक दूधधंदा अडचणीत आला आहे.जलसंपदा विभाग राधाकृष्ण विखे पाटील यांना मिळाल्यामुळे पठार भागातील जनतेच्या आशा पुन्हा पल्लवीत झाल्या आहेत.
पूर्वेकडे पाणी वळवण्याची गरज
दिवंगत माजी केंद्रीय मंत्री बाळासाहेब विखे पाटील यांनी अहिल्यानगर, नाशिक, पुणे जिल्ह्यांतून २२.९ टीएमसी समुद्राकडे जाणारे पाणी पूर्वेकडे वळवले, तर जिल्ह्यासह मराठवाडयाची पाणी टंचाई दूर होईल, असे सांगितले होते, पण आर्थिक स्थिती वा इतर राजकीय नेत्यांनी मदत न केल्याने हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प पूर्ण झाला नाही.आता त्यांचे सुपूत्र राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे जलसंपदा खाते आल्याने हा प्रकल्प पूर्ण होईल,अशी नागरिकांना आशा आहे.