Ahmednagar News : ‘माझे बंधू रमाकांत गाडे यांचा राजकारणाशी काहीही संबंध नाही. अन्नधान्य वितरण निविदा कामाच्या निमित्ताने रमाकांत व मुलगा नगरसेवक योगीराज गाडे मुंबईला गेले होते. तेथे त्यांना नगरसेवक अनिल शिंदे यांनी फसवून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे नेले व छायाचित्रासाठी उभे केले,’ असा दावा शिवसेनेचे जिल्हा प्रमुख प्रा. शशिकांत गाडे यांनी केला आहे.
नगरमधील आजीमाजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. यामध्ये जिल्हा प्रमुख प्रा. शशिकांत गाडे यांचा मुलगा आणि भावाचाही समावेश होता. त्यावरून टीका सुरू झाली असतानाच गाडे यांनी खळबळजनक खुलासा केला आहे.
गाडे म्हणाले, मी पक्ष प्रमुख ठाकरेंसमवेतच आहे. यासंबंधी नगरसेवक योगीराज गाडे यांच्यासमवेत शुक्रवारी माध्यमांसमोर भूमिका स्पष्ट करणार आहे. मात्र गाडेंचा हा दावा शिसैनिकांना मान्य नाही. याची नैतिक जबाबदारी स्वीकारून जिल्हा प्रमुख गाडे यांनी पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी नगरसेवक गणेश कवडे यांनी केली आहे.