Ahmednagar News : नगर तालुक्यातील नगर-औरंगाबाद महामार्गावरील गॅस पाईपलाईनच्या कामाविरोधात ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेत या कामाच्या ठेकेदाराला मशीनरीची तोडफोड करून त्या जाळून टाकण्याचा इशारा दिला आहे.
गॅस पाईपलाईनचे काम मनमानी पद्धतीने सुरू असून ठेकेदाराची मुजोरी सुरूच आहे. काम करताना सर्व नियम धाब्यावर बसवून काम सुरू आहे. यात शेकडो झाडांची कत्तल, शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान, अनेक व्यावसायिकांचे प्रचंड नुकसान तसेच कामातील हलगर्जीपणामुळे अपघातात अनेक निष्पापांचे बळी गेले आहेत.
असा आरोप यावेळी ग्रामस्थांकडून करण्यात आला. गावाला पिण्याच्या पाण्यासाठी बुऱ्हाणनगर वरून येणारी पाईपलाईन वारंवार फोडण्यात येत आहे. त्यामुळे जेऊर गावामध्ये पाण्याची भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. पाईपलाईन फोडल्यानंतर ती तात्काळ जोडून दिली जात नाही त्यामुळे ग्रामस्थांची पाण्यासाठी भटकंती सुरू आहे.
त्यामुळे संतप्त नागरिकांनी पाईपलाईनचे काम बंद पाडले.
यावर प्रशासन तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाकडून त्यांच्यावर कारवाई होत नसल्याने ग्रामस्थ आश्चर्य व्यक्त करत आहेत. ठेकेदारांची मनमानी सुरू असून त्यावर तात्काळ कारवाई करावी, पिण्याच्या पाण्याच्या पाईप लाईनची दुरुस्ती करावी,
अपघातात मृत झालेल्या व्यक्तींबद्दल संबंधित ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा तसेच शेतकरी व व्यावसायिक यांचे झालेले नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. अन्यथा कोणत्याही परिस्थितीत काम करू देणार नाही असा इशारा यावेळी देण्यात आला.