Ahmednagar Politics :- वाळू आणि बदल्यांच्या पैशात अडकलेल्यांनी फक्त विकासाच्या गप्पा मारल्या. त्यांनी सर्वसामान्याला काय दिले? भविष्यात याचा हिशेब निश्चित होणार आहे. परंतु या संकटाच्या कठीण काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रातील जनतेच्या मागे खंबीरपणे उभे राहिले.
तर दुसरीकडे आघाडी सरकारच्या काळात भ्रष्टाचाराचे डोंगर उभे करणाऱ्या मंत्र्यांनी जनतेला वाऱ्यावर सोडून दिले होते. अशी टीका खासदार डॉ. सुजय विखे यांनी केली. केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय अधिकारीता मंत्रालयाच्या वतीने देशातील ज्येष्ठ नागरिकांसाठी सुरू करण्यात आलेल्या
राष्ट्रीय वयोश्री योजनेतील लाभार्थ्यांना साहित्याचे वितरण खासदार विखे यांच्या हस्ते करण्यात आले, यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले की, कोरोनाच्या संकटात पंतप्रधान मोदी यांनी महत्वपूर्ण निर्णय घेऊन या देशातील जनतेला दिलासा दिला.
महाराष्ट्रातील जनतेला देखील त्यांच्या या निर्णयाचा फायदा झाला. परंतु राज्यात मागील अडीच वर्षात आघाडी सरकारच्या काळात फक्त भ्रष्टाचार बोकाळला. वाळू माफीया आणि बदल्यांचे रॅकेट खुलेआम कार्यरत होते. यातून मिळालेला पैसाच सहकारी संस्थांच्या निवडणुकात वापरला.
ज्येष्ठ नागरीकांसाठी वयोश्री योजना सुरू करून केंद्र सरकारने आपले सामाजिक दायित्व निभावले आहे. राज्यात आता शिंदे- फडणवीस सरकार सतेवर आल्याने राज्यात पुन्हा नव्याने विकासाची प्रक्रीया सुरू होईल, असेही म्हणाले.