Ahmednagar News : लोणी गावचे भूमीपुत्र आणि लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे माजी विद्यार्थी डॉ. नितीन करीर यांची राज्याचे मुख्य सचिव म्हणून निवड झाल्यानंतर महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी नुकतीच भेट घेवून त्यांचा सन्मान केला.
राज्याचे ४७ वे मुख्य सचिव म्हणून डॉ. नितीन करीर यांची निवड झाल्यानंतर आपल्या पदाचा पदभार त्यांनी स्विकारला. मंत्री विखे पाटील यांनी त्यांची भेट घेवून त्यांचा गौरव केला. डॉ. नितीन करीर यांची निवड झाल्यानंतर लोणी बुद्रुक ग्रामस्थांनी आनंद आणि समाधान व्यक्त करतानाच फटाके फोडून हा आनंद द्विगुणीत केला होता.
डॉ. नितीन करीर हे मुळचे लोणी बुद्रुक गावचे असून, प्रवरा पब्लिक स्कुल मध्ये त्यांचे शिक्षण पुर्ण झाले. १९८८ सालच्या बॅचचे आय.ए.एस आधिकारी म्हणून त्यांनी प्रशासकीय सेवेत आपले कार्य सुरु केले. प्रशासनामध्ये वेगवेगळ्या मोठ्या पदांवर काम करतानाही त्यांनी लोणी गावाची नाळ तुटू दिली नाही. या गावाशी ऋणानुबंध त्यांनी कायम ठेवला आहे
राज्याचे मुख्य सचिव म्हणून जबाबदारी स्विकारल्यानंतर प्रवरेच्या सुपूत्राचा अभिमान असल्याची भावना महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी या भेटी दरम्यान व्यक्त केली. लोणी गावाला येण्याचे निमंत्रणही देण्यात आले असून, लवकरच त्यांचा ग्रामस्थांच्या वतीने नागरी सत्काराचे आयोजन केले जाणार असल्याची माहिती मंत्री विखे पाटील यांनी दिली.