Ahmednagar News : अहमदनगर जिल्हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने राज्यातील सर्वात मोठा जिल्हा आहे. तब्बल १७ हजार ४१२ चौ. किमी असलेला हा जिल्हा उत्तर नगर जिल्हा आणि दक्षिण नगर जिल्हा, अशा दोन भागात विभागला गेला आहे. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून जिल्हा विभाजनावरुन राजकारण रंगत आहे. दरम्यान, गोवा राज्यापेक्षा पाचपट क्षेत्रफळ असलेला अहमदनगर जिल्हा आहे.
नगर जिल्ह्याच्या विभाजनाचा प्रस्ताव गेल्या ४० वर्षापासून शासन दरबारी प्रलंबित आहे. गुणवत्तेच्या आधारे श्रीरामपूर या शहराचीच शिफारस जिल्हाधिकारी आणि नाशिक येथील विभागीय आयुक्त यांनी राज्य सरकारकडे केलेली आहे. केवळ राजकीय इच्छाशक्ती आणि श्रेयवादामुळे हा प्रश्न रखडला आहे. त्यासाठी सातत्याने विविध अराजकीय संघटनांची आंदोलने सुरु आहेत.
जिल्ह्याचे विभाजन करून आगामी १५ ऑगस्ट पर्यंत गुणवत्तेच्या आधारे श्रीरामपूर जिल्हा मुख्यालयाची घोषणा करावी, अन्यथा पुढील काळात आंदोलन तीव्र करून वेळप्रसंगी आगामी विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा आंदोलनकांनी दिला आहे.
रविवारी (दि.१४) श्रीरामपूर जिल्ह्याच्या मागणीसाठी श्रीरामपूर शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला.स्वाभिमानी श्रीरामपूर जिल्हा कृती समितीच्यावतीने तसेच सर्वपक्षीयांच्या वतीने काल हे आंदोलन करण्यात आले. त्यास व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
याप्रसंगी शहरातील महात्मा गांधी चौकात आंदोलन केले. या संदर्भात तहसीलदार मिलिंदकुमार वाघ यांना निवेदन देण्यात आले. बंदच्या आवाहनाच्या पार्श्वभूमीवर सर्व व्यावसायिकांनी आपले व्यवसाय पूर्णपणे बंद ठेवले होते.
त्यामुळे नेहमी गजबजलेले असलेले रस्ते काल दिवसभर जवळपास निर्मनुष्य दिसत होते. श्रीरामपूर जिल्हा व्हावा, ही श्रीरामपूरकरांची ४० वर्षांपासूनची मागणी आहे. या बंदने या मागणीला बळ मिळाले आहे. माजी खा. सदाशिव लोखंडे यांनी श्रीरामपूर जिल्हा मागणीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठपुरावा करु, असे आश्वासन दिले.
यावेळी स्वाभिमानी श्रीरामपूर जिल्हा कृती समितीचे अध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांनी दि.१५ ऑगस्टपर्यंत श्रीरामपूर जिल्हा मुख्यालय झाले नाही तर मंत्रालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा दिला.
तर शिवसेना उपजिल्हाप्रमुख प्रमुख सचिन बडदे यांनी श्रीरामपूर जिल्हा मुख्यालय करावे, ही मागणी अनेक दिवसांपासून प्रलंबित आहे. त्यासाठी प्रवरेपर्यंत दिंडी काढून महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे मागणी करणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.