अहमदनगर Live24 टीम, 16 मे 2021 :-पावसाळा तोंडावर आला असतानाही महापालिकेने कुठल्याही उपाययोजना सुरू केल्या नाहीत, मागील वर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस झाला होता त्यावेळी या शहरातील नाल्यांचे पाणी नागरिकांच्या घरामध्ये शिरले होते.
त्यामुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले होते. त्याच घटनेची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी पावसाळा सुरू होण्यापूर्वी महापालिकेने सर्व नाल्यांची साफसफाई करून ते मोकळे करा, तसेच आवश्यक कामेही पूर्ण करावी अशी मागणी मनपा नगरसेविका ज्योती गाडे यांनी केली आहे.
यावेळी नगरसेविका गाडे यांनी या मागणीचे निवेदन मनपा आयुक्त शंकर गोरे यांना दिले. दिलेल्या निवेदनात म्हटले की, प्रभाग क्रमांक ४ मध्ये दळवीमळा,मार्कंडे सोसायटी, कोहिनूर मंगल कार्यालय परिसर,नरहरी नगर, तारकपूर,सिव्हिल हडको, या भागातून लहान-मोठे अनेक ओढे-नाले वाहतात.
परंतु आता ते नाले पण तुडूंब चिखलाने भरले आहे. त्यांची साफसफाई होणे गरजेचे आहे. अन्यथा येत्या पावसाळ्यात नागरिकांच्या घरामध्ये पावसाचे पाणी जाऊन नागरिकांचे मोठे हाल होतील,
आर्थिक नुकसानी बरोबर नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊन या प्रभागात साथीचे आजार पसरतील पावसाळा आता दहा ते पंधरा दिवसांवर आला आहे.
परंतु मनपा प्रशासनाच्या वतीने नाल्यांच्या साफ-सफाई बाबत कुठलीही हालचाली दिसत नाही तरी संबंधित विभागाने तात्काळ योग्य ती कारवाई सुरू केली नाही तर नागरिकांची मोठी गैरसोय निर्माण होईल असे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.