जिल्हाधिकाऱ्यांचे सरपंचांना आवाहन; म्हणाले गावं सांभाळा’

अहमदनगर Live24 टीम, 14 मे 2021 :- करोनाच्या पहिल्या लाटेत तीव्रता कमी असतानाही सगळ्यांनी नियम पाळले. मात्र, आता कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत रुग्णसंख्या वाढत असतानाही नागरिक गांभीर्याने याकडे पाहत नाहीत, ही चिंताजनक बाब आहे.

आता तिसरी लाट येत असून यापासून होणार प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी आता थेट गावपातळीवर सरपंचांना आवाहन केले आहे.

जिल्हाधिकारी भोसले यांनी थेट ग्रामपातळीवरील अधिकारी आणि गावच्या सरपंचांशी संवाद साधण्यास सुरुवात केली आहे. विविध गावांचे सरपंच, ग्रामसेवक, तलाठी, पोलीस पाटील यांच्याशी त्यांनी दूरदृश्यप्रणालीद्वारे संवाद साधला.

यावेळी आदर्श गाव संकल्प व कार्य समितीचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी यांनी नगर शहरातील रुग्ण संख्या कमी होत असल्याने आता ग्रामीण भागावर प्रशासनाने लक्ष केंद्रित केले आहे.

‘जूनच्या शेवटच्या आठवड्यात तिसरी लाट सक्रीय होईल. पुढील वर्षभर तरी आपल्या तोंडावरील मास्क आणि हातावरील सॅनिटायझर कायम राहील,’ असा अंदाज सांगत हे गृहीत धरूनच काम करण्याचे आवाहनही जिल्हाधिकाऱ्यांनी केलं आहे.

प्रशासनाला सहकार्य म्हणजे गावाने गावकऱ्यांनाच सहकार्य करण्यासारखे आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवरच सर्वांनी मिळून आता या करोनाचा सामना करायला हवा.

गटतट पाहण्याची ही वेळ नाही आणि ते असलेच तर प्रत्येकाने आपापल्या गटांची काळजी घेऊन करोनाला हद्दपार करण्यासाठी एकत्र यावे, असं जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटलं आहे.

हिवरेबाजार येथे करोना संसर्ग आटोक्यात आणण्यात तेथील ग्रामपंचायतीने यश मिळविले आहे. त्यामुळे तेथील अनुभव आणि कशापद्धतीने तेथे करोनाचा मुकाबला केला गेला त्याची माहिती पोपटराव पवार यांनी यावेळी दिली.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24