Ahmednagar News : श्रीरामपूर विधानसभा मतदार संघातील रस्त्यांच्या कामासाठी पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी ९ कोटी रूपयांचा निधी मंजूर करून घेतला.
मात्र, न केलेल्या कामाचे श्रेय घेण्यासाठी श्रीरामपूरचे आ. लहू कानडे हे केवळ प्रसिद्धीबाजी करीत आहे. त्यांचा हा न केलेल्या कामाचे श्रेय घेण्याचा प्रकार अत्यंत केविलवाणा असल्याची टीका भाजपाचे तालुकाध्यक्ष दिपक पटारे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.
याबाबत दिलेल्या पत्रकात दिपक पटारे यांनी म्हटले आहे की, महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभाग, संगमनेर अंतर्गत येणाऱ्या जुलै २०२४ च्या अर्थसंकल्पात समाविष्ट केलेल्या कामांची जे सरकारी परिपत्रक आहे.
त्यावर मतदारसंघ, कोणी काम सुचविले त्या लोकप्रतिनिधीचे नाव, कामाचे नाव तसेच रक्कम आदी मजकूर आहे. त्यावर मतदारसंघामधील शिर्डी, राहाता, संगमनेर, श्रीरामपूर या नावांच्या पुढे काम सुचवणाऱ्या लोकप्रतिनिधींचे नाव म्हणून पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांचे नाव लिहीलेले आहे.
त्यामध्ये श्रीरामपूरातील खोकर कारेगाव- भेर्डापूर रस्ता, बेलापूर- ऐनतपूर- सुभाषवाडी शिरसगाव रस्ता, टाकळीभान ते गणेशखिंड रस्ता, ब्राम्हणगाव ते शिरसगाव रस्ता, वाकडी फाटा ते संकेत नर्सरी रस्ता या कामांचा समावेश असून त्यासमोर सदर रस्त्यांसाठी मंजूर निधीची रक्कम देण्यात आलेली आहे.
बांधकाम खात्याच्या कागदपत्रावर पालकमंत्री ना. विखे पाटील यांचे नाव असताना ही कामे आपल्याच प्रयत्नाने मंजूर झाल्याच्या बातम्या आ. लहू कानडे यांच्या कार्यालयातून प्रसिद्धीस दिलेल्या आहेत. त्यात ही सर्व ९ कोटींच्या रस्त्यांची कामे आ. कानडे यांच्या प्रयत्नातून मंजूर झाल्याचे म्हटले आहे.
जी कामे लोकप्रतिनिधींनी केलीच नाही, ज्यांच्यामुळे ती मंजूर झालीच नाही. त्यांनी सदर कामे पालकमंत्री ना. विखेंनी मंजूर केल्यानंतर त्याची माहिती घेवून घाईघाईत प्रेसनोट प्रसिद्ध करून त्याचे श्रेय लाटण्याचा हा प्रयत्न केला असल्याचेही पटारे यांनी म्हटले आहे.
श्रीरामपूर तालुक्यासाठी आणि नगरपालिका हद्दीतही कोट्यावधी रूपयांचा निधी पालकमंत्री ना. विखे पाटील यांनी आतापर्यंत दिलेला आहे आणि यापुढेही ते देणार असल्याचे पटारे यांनी प्रसिध्दी पत्रकात नमुद केले आहे.