मी लोकहित, वचित बहुजन समाजहितासाठी राजकारणात असून काही निर्णय व वेगळ्या भूमिका घेतल्या, तर त्यात चुकीचं काय आहे. मला काही भूमिका घ्यायच्या आधी सर्वांना बोलवून सांगेन, छाती ठोक भूमिका घेईल. मी मुंडे साहेबांची कन्या आहे. मी कुणासमोरही झुकणार नाही, अशी भावना पंकजा मुंडे यांनी गोपीनाथ गडावरील कार्यक्रमांत व्यक्त केली.
भाजपचे दिवंगत ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने गोपीनाथ गडावर शनिवारी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. आज झालेल्या कार्यक्रमांत प्रसिद्ध रामायणाचार्य रामराव महाराज ढोक यांचे सुश्राव्य किर्तन झाले.
कीर्तनानंतर उपस्थितांशी संवाद साधताना पंकजा मुंडे बोलत होत्या. यावेळी पंकजा मुंडेंनी आक्रमकपणे आपल्या भावना व्यक्त केल्या. पंकजा मुंडे म्हणाल्या की, सत्य, स्वाभिमान अन् वंचितांच्या सेवेचा वसा शेवटपर्यंत सोडणार नाही. सर्वच पक्षांमध्ये बदल होत असतात, माझ्या पक्षातही बदल झाले आहेत.
मी मनात काही साठवून ठेवत नाही. लोकांच्या हितासाठी भूमिका घेते. भाषणातील बोलण्याचे काहीही अर्थ लावून चर्चा घडवल्या जात आहेत. याने कोणीही बिथरुन जाण्याची गरज नाही. मला भूमिका घ्यायची असेल, तर ती छातीठोक व जगजाहीर घेईल.
माझे नेते अमित शहा असून मी त्यांच्याशी मनमोकळी चर्चा करणार आहे असेही त्या म्हणाल्या. राज्यातील विविध पक्षातील नेत्यांनी आज गोपीनाथ गडावर हजेरी लावून अभिवादन केले. राष्ट्रवादीचे आ. एकनाथ खडसे, भाजपा खासदार रक्षा खडसे, धनंजय मुंडे, गंगाखेडचे आमदार रत्नाकर गुट्टे सह अनेक मान्यवर उपस्थित होते.
पक्षातील काही नेते पंकजा मुंडे यांना डावलत आहेत, असा आरोप एकनाथ खडसे यांनी केला. भाजप हा पूर्वीसारखा पक्ष राहिला नाही. ज्यांचे पक्षासाठी काहीच योगदान नाही अशा नव्यांना पक्षात महत्व दिले जात आहे.
दरम्यान, खडसे व पंकजा मुंडे तसेच डॉ. प्रितम मुंडे यांच्यामध्ये बंद दाराआड चर्चा झाली. ही आमची कौटुंबिक भेट होती. यामध्ये कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही, असे खडसे म्हणाले.