Ahmednagar News : माजी मंत्री आमदार शंकरराव गडाख यांनी आक्रमक पावित्रा घेऊन निर्माण केलेला दबाव, तसेच सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे मुळा, भंडारदरा धरणातून मराठवाड्यासाठी सोडण्यात आलेल्या
पाण्यातून मुळा, प्रवरा नद्यांवरील नेवासा तालुक्यातील सर्व बंधारे पूर्ण क्षमतेने भरण्यात आल्याने शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
समन्यायी कायद्याच्या माध्यमातून मुळा व भंडारदरा धरण समूहातून मराठवाड्याला पाणी सोडण्यास नेवासा तालुक्याचे आमदार गडाख यांनी कडाडून विरोध केला. मराठवाड्याला पाणी सोडण्याच्या विरोधात त्यांनी घोडेगाव येथे हजारो शेतकऱ्यांच्या उपस्थितीत रास्ता रोको आंदोलन करून प्रशासनावर दबाव निर्माण केला होता.
यावेळी त्यांनी मुत्सद्देगिरी दाखवत कायदेशीर तांत्रिक बाबी लक्षात घेऊन न्यायालयीन हस्तक्षेपातून मराठवाड्याला पाणी सोडण्याची वेळ ओढवल्यास या पाण्यातून मुळा व प्रवरा नद्यांवरील नेवासा तालुक्यातील सर्व बंधारे फळ्या टाकून
पूर्ण क्षमतेने भरून देण्याचा संबंधितांकडून शब्द घेतला होता. एवढ्यावरच न थांबता त्यांनी जलसंधारण विभागाच्या नाशिक येथील मुख्य अभियंत्यांना लेखी निवेदन देऊन तालुक्यातील बंधारे भरून देण्याच्या मागणीचा पाठपुरावा केला होता.
मुळा व भंडारदरा धरण समूहातून मराठवाड्यासाठी पाणी सोडल्यानंतर या पाण्यातून मुळा तसेच प्रवरा नदी पात्रातील नेवासा तालुक्यातील सर्व कोल्हापूर टाईप बंधारे फळ्या टाकून पूर्ण क्षमतेने भरून देण्यात आले आहेत. बंधारे भरल्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले असून आमदार गडाख यांचे सर्वत्र आभार मानले जात आहेत