Ahmednagar News : तरुण शेतकऱ्याला विष पाजल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींविरुद्ध टाकळीमियाँ येथील व्यावसायिक दादासाहेब सुरेश तुपे यांनी सहाय्यक निबंधकांकडे अवैध सावकारकी केल्याची लेखी तक्रार दाखल केली आहे.
तक्रारीत म्हटले, की सावकारांनी मला पाच हजार रुपये २० टक्के व्याजाप्रमाणे दिले होते. प्रत्येक महिन्याला एक हजार रुपये मी व्याज देत होतो; परंतु व्याज देण्यास विलंब झाल्यास दर दिवस २०० रुपयेप्रमाणे दंड ते सावकार माझ्याकडून दमदाटी करून वेळोवेळी वसूल करीत होते.
अनेक वेळा माझ्या टाकळीमियाँ गावात येऊन मला धमकी देऊन माझ्याकडून पैसे वसूल केले. एके दिवशी त्यांनी मला खडांबे फाटा येथे बोलावून माझ्या गाडीची चावी व मोबाईल हिसकावून घेतला व पैसे दिले तर गाडी व मोबाईल देऊ, असा दम दिला व अनेक वेळा मला रेल्वेखाली लोटून देऊ अशा धमक्या दिल्या.
माझा टाकळीमियाँ गावात छोटा सलून व्यवसाय असून त्यावर माझा उदरनिर्वाह चालतो. मी त्यांच्याकडून घेतलेल्या पाच हजार रुपयांचे २५ हजार रुपये व्याजासह सावकाराकडे सुपुर्द केले.
तरीही तिघा सावकारांनी मला वेळोवेळी पैशासाठी फोनवरून अरेरावीची भाषा वापरून दम दिला. त्याचे सर्व फोन रेकॉर्डिंग माझ्याकडे उपलब्ध आहे. त्यामूळे वरील व्यक्तींवर सावकारकीचा गुन्हा दाखल करून अवैध सावकारकीला आळा घालावा, असे तक्रारीत म्हटले आहे.