अहमदनगर बातम्या

उड्डाणपूल दुर्घटनेवरून काँग्रेस नेते किरण काळे आक्रमक; दोषपूर्ण कामासाठी जबाबदार असणाऱ्यांवर …?

Ahmednagar News : नगर शहरातील बहुचर्चित उड्डाणपुलावरून एक मोठा आयशर ट्रक थेट खाली कोसळल्यामुळे मोठी दुर्घटना घडली आहे. यामध्ये एकाचा प्राण गेला असल्याची प्राथमिक माहिती समोर येत असून काही लोक गंभीररित्या जखमी असल्याचे समजते आहे.

या घटनेवरून शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे आक्रमक झाले असून, त्यांनी या उड्डाण पुलाच्या दोषपूर्ण कामासाठी जबाबदार असणाऱ्या अधिकारी, ठेकेदार, राजकीय नेते यांच्यावर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्याची जाहीर मागणी पोलीस प्रशासन आणि सरकार कडे केली आहे. हा उड्डाणपूल म्हणजे मृत्यूचा सापळा झाला असल्याचा घाणाघात त्यांनी केला आहे.

किरण काळे यांनी म्हटले आहे की, यापूर्वी देखील या उड्डाण पुलावर अनेक अपघाताच्या घटना घडल्या आहेत. यामध्ये अनेक लोक गंभीरित्या जखमी झाले असून काहींना प्राण गमवावे लागले आहेत. हा उड्डाणपूल म्हणजे आता मृत्यूचा सापळा झाला आहे.
मुळात या पुलाचे काम करताना इंजीनियरिंगच्या दृष्टिकोनातून आवश्यक असणाऱ्या बाबींची योग्य ती पूर्तता करण्यात आलेली नाही.

काम देखील निकृष्ट रित्या करण्यात आले आहे. त्यामुळे कोट्यावधी रुपये खर्च करून नागरिकांना मात्र हाती काहीच आलेले नाही. काही दिवसांपूर्वी उड्डाणपुलाचा एक मोठा भाग भाग कोसळून खाली पडल्यामुळे शहरातील एका चार चाकी चालकाचा अपघात पुलाखाली झाला होता.

त्यावेळी चार चाकी असल्यामुळे सदर व्यक्ती बालमबाल वाचली होती. हा सिलसिला काही थांबायचे नाव घेत नाही. त्यामुळे नगरकरांमध्ये या उड्डाणपूला वरून व खालून देखील जाण्याबाबत मोठी भीती मनामध्ये निर्माण झाली आहे.

काळे यांनी या बाबत उड्डाणपूलाच्या कामाचे श्रेय घेणाऱ्या माजी खा. डॉ. सुजय विखे पाटील व आ. संग्राम जगताप यांच्यावर जोरदार टीका केली आहे. केवळ राजकीय श्रेय घेण्याकरिता अट्टाहास करत सदोष काम करण्यास प्रशासकीय यंत्रणेला दबाव टाकत भाग पाडले गेले. अधिकारी, ठेकेदार देखील या दबावाला बळी पडले.

या कामात सर्वांनी संगनमत करत मोठा भ्रष्टाचार केला आहे. त्यामुळेच दोषपूर्ण काम करत केवळ कोट्यावधी रुपयांची बिले लाटली गेली. मात्र यामध्ये सर्वसामान्यांचा जीव जात आहे. ही गंभीर बाब आहे. वारंवार घडणाऱ्या या घटनांना जबाबदार असणाऱ्या व्यक्तींवर तात्काळ सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करावा, अशी काँग्रेसच्या वतीने काळे यांनी प्रशासनाकडे जाहीर मागणी केली आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts