अहमदनगर बातम्या

मनपा पोट निवडणूक पॅम्प्लेट वरून वादंग, काँग्रेस नेत्यांचा अवमान कदापि खपवून घेणार नाही

अहमदनगर Live24 टीम, 14 डिसेंबर 2021 :-  प्रभाग ९ च्या मनपा पोटनिवडणुकीत प्रचाराचा काल शुभारंभ करण्यात आला. महाविकास आघाडीच्या वतीने देण्यात आलेल्या सुरेश तिवारी या उमेदवारांच्या प्रचाराचा राष्ट्रवादीच्या आमदारांच्या हस्ते नारळ फोडून शुभारंभ करण्यात आला.(amc news)

काँग्रेसचा एकही नेता, पदाधिकारी यावेळी उपस्थित नव्हता. मात्र तिवारी यांच्या प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रचाराच्या पॅम्पलेट वरून नवीन वादंग उभे राहिले आहे.

काँग्रेस नेत्यांचा अवमान काँग्रेस कार्यकर्ते कदापि खपवून घेणार नाहीत, असा आक्रमक इशारा काँग्रेसच्या क्रीडा विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष प्रवीणभैय्या गीते पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिला आहे.

उमेदवार सुरेश तिवारी यांच्या प्रचाराचे पॅम्पलेट प्रसिद्ध करण्यात आले आहे. सोशल मीडियावर एक पॅम्पलेट फिरत आहे तर प्रत्यक्षात प्रिंट करून प्रभागामध्ये दुसरेच पॅम्पलेट वाटण्यात येत आहे.

प्रभागात मतदारांना वाटण्यात येणाऱ्या पॅम्पलेटवर काँग्रेस नेत्यांचा अवमान झाला असल्याचे काँग्रेसचे म्हणणे आहे. राज्याचे विधिमंडळ पक्षनेते तथा महसूल मंत्री बाळासाहेब थोरात हे काँग्रेस पक्षाचे राज्य सरकार मध्ये पक्षाच्यावतीने क्रमांक एकचे नेते म्हणून नेतृत्व करतात.

राज्य सरकारच्या सर्व जाहिराती व प्रसिद्धी पत्रकामध्ये प्रोटोकॉल म्हणून मुख्यमंत्री (शिवसेना), उपमुख्यमंत्री (राष्ट्रवादी) व महसूल मंत्री (काँग्रेस) या तीन नेत्यांचे याच क्रमाने सत्तेतील तीन पक्षांचे नेते या नात्याने फोटो नेहमी प्रसिद्ध केले जातात.

मात्र सुरेश तिवारी यांच्या प्रसिद्धी पत्रकावर मंत्रिमंडळामध्ये पहिल्यांदाच मंत्री झालेले व सर्वात ज्युनियर मंत्री असलेले आदित्य ठाकरे यांच्या छायाचित्रा नंतर महसूल मंत्री ना. थोरात यांचा फोटो टाकून अवमान करण्यात आल्याचे काँग्रेसचे म्हणणे आहे.

एवढेच नाही तर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आ. नाना पटोले हे एका राष्ट्रीय पक्षाचे राज्याचे प्रमुख आहेत. ते विधानसभेचे माजी सभापती आहेत. त्यांचा प्रोटोकॉल हा मोठा असताना देखील त्यांना देखील शिवसेनेच्या ज्युनियर मंत्र्या नंतर स्थान देण्यात आल्यामुळे त्यांचा ही अवमान झाला आहे.

ना. थोरात व प्रदेशाध्यक्ष आ.पटोले यांचा अवमान यावर झाला आहे. ही बाब काँग्रेस कार्यकर्त्यांची भावना दुखावणारी असल्याचे मत काँग्रेसचे प्रवीण गीते पाटील यांनी व्यक्त केली आहे. महाविकासआघाडी झाली असे आपण म्हणता. तसा सर्व ठिकाणी भाषणांमध्ये उल्लेख करता.

मग अर्ज दाखल करताना काँग्रेसच्या कोणत्या पदाधिकाऱ्यांना आपण समवेत घेऊन अर्ज दाखल केला ? प्रचाराचा शुभारंभ करतांना काँग्रेसला आपण निमंत्रण का दिले नाही ? या पॅम्पलेटवर शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा काँग्रेसचे शहराचे नेते या नात्याने किरण काळे,

याच प्रभागातील काँग्रेस पक्षाचे शहराचे ज्येष्ठ नेते, माजी नगराध्यक्ष, माजी महापौर तसेच प्रदेश काँग्रेसचे सचिव दीप चव्हाण तसेच काँग्रेस पक्षाच्या याच प्रभागातील विद्यमान लोकप्रिय नगरसेविका शीला चव्हाण यांचा फोटो जाणीवपूर्वक या पत्रकावर टाकण्यात आलेला नाही. याकडे काँग्रेसने प्रसिद्धीपत्रकाद्वारे लक्ष वेधले आहे.

या प्रभागामध्ये काँग्रेसचे विद्यमान दोन नगरसेवक आहेत. दोन्ही नगरसेवक हे मोठ्या मताधिक्याने निवडून आलेले आहेत. या प्रभागामध्ये कॉंग्रेसला मानणारा मतदार मोठ्या संख्येने असून मागील निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीच्या उमेदवाराचे याच प्रभागामध्ये डिपॉझिट जप्त झाले होते.

तसेच या प्रभागामध्ये काँग्रेसचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते असून त्यांचा या प्रभागामध्ये मतदारांशी दांडगा जनसंपर्क आहे. त्यामुळे काँग्रेसचा मोठ्या संख्येने मतदार असणाऱ्या या प्रभागामध्ये काँग्रेसला डावलून उमेदवार सुरेश तिवारी यांना यश संपादन करणे कसे शक्य होणार असा मुद्दा यानिमित्ताने काँग्रेसने तोफ डागल्यामुळे उपस्थित होत आहे.

विद्यमान प्रभारी शिवसेना शहरप्रमुख संभाजी कदम यांनी राष्ट्रवादीच्या आमदारांच्या दबावातून हे कृत्य केलेले आहे. या पूर्वीचे शिवसेना शहर प्रमुख दिलीप सातपुते शिवसेनेचे नेतृत्व करत असताना असे कधी काँग्रेसच्या बाबतीमध्ये घडले नव्हते. शिवसेनेच्या मदतीला काँग्रेस व काँग्रेसच्या मदतीला शिवसेना सतत धावून आली आहे हा इतिहास आहे.

सातपुते यांची सर्वांना बरोबर घेऊन जाण्याची भूमिका असायची. ते स्व. अनिलभैया राठोड यांच्या प्रेरणेने चालायचे. शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे हे तर काँग्रेसचे नेते असून देखील उघडपणे वारंवार सांगत असतात की आम्ही स्व.अनिलभैया राठोड यांच्या प्रेरणेने काम करतो.

स्व.अनिलभैया राठोड यांनी एका ठराविक प्रवृत्तीच्या विरोधामध्ये कायम या शहरामध्ये लढा उभारला होता. ते आज हयात असते तर या प्रभागातील निवडणुकीतील चित्र देखील वेगळे राहिले असते. मात्र काही मंडळींनी त्याला आता मूठमाती देऊन वैयक्तिक स्वार्थासाठी काही प्रवृत्तींशी जुळवून घेतले आहे.

कुणी कुणाशी अंधारात काय जुळवुन घ्यावे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. काँग्रेस ही कोणाच्या दावणीला बांधलेली नसून काँग्रेसच्या राज्य व शहर स्तरावरील कोणत्याही नेत्याचा अवमान काँग्रेस कार्यकर्ते कदापि खपवून घेणार नाहीत, असा स्पष्ट इशारा प्रवीण गीते पाटील यांनी काँग्रेसच्या वतीने दिला आहे.

काँग्रेसचा करण्यात आलेला हा अत्यंत गंभीर मुद्दा असून यासंदर्भात आम्ही काँग्रेसचे कार्यकर्ते, पदाधिकारी शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरणभाऊ काळे यांची लवकरच भेट घेऊन चर्चा करणार आहोत.

या संदर्भातील अहवाल हा महसूल मंत्री थोरात, प्रदेशाध्यक्ष आ. पटोले यांना लेखी स्वरुपात पाठविला जाईल असे देखील काँग्रेसच्या वतीने देण्यात आलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हणण्यात आले आहे. अकोले नगरपंचायत निवडणुकीमध्ये देखील राष्ट्रवादीचे आ.किरण लहामटे यांच्यावर काँग्रेस नेते, जिल्हा बँकेचे संचालक मधुकर नवले यांनी काल सडकून टीका करत आघाडी तोडत त्याठिकाणी काँग्रेसचे स्वतंत्र सात ठिकाणी उमेदवार उभे केले आहेत.

नगर शहरामध्ये उमेदवार तिवारी यांच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या पत्रकावरून वादंग उभे राहिल्यामुळे व काँग्रेस सुरुवातीपासूनच या प्रचारापासून अलिप्त राहिल्यामुळे नगर शहरामध्ये राष्ट्रवादी व शिवसेना अशी आघाडी आहे की महाविकासआघाडी आहे याबाबत मात्र प्रश्नचिन्ह निर्माण झाले असल्याची चर्चा शहरात यानिमित्ताने झडू लागली आहे.

त्यातच राहुल गांधी यांच्या मुंबईतील नियोजित सभेला राज्य सरकारनेच परवानगी नाकारल्यामुळे राज्यस्तरावर देखील काँग्रेसच्या वतीने नाराजीचे सूर उमटत आहेत.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts