अहमदनगर Live24 टीम, 13 डिसेंबर 2021 :- मनपाचा नगरसेवक श्रीपाद छिंदम याचे नगरसेवक पद रद्द झाले. या रिक्त जागेवर निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. या निवडणुकीस स्थगिती व्हावी, यासाठी छिंदम याने दाखल केलेला अर्ज फेटाळला आहे.
श्रीपाद छिंदम हा उपमहापौर असताना त्याने महापुरूषाबद्दल अवमानकारक वक्तव्य केले होते. या वक्तव्यावरून महापालिकेने विशेष सर्वसाधारण सभा घेऊन त्याला उपमहापौर पदावरून बडतर्फ केले होते.
त्यानंतर महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत छिंदमने प्रभाग क्रमांक नऊ (क) मधून निवडणूक लढविली होती. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी छिंदमचे नगरसेवक पद रद्द केले होते.
कोरोना संसर्गाची लाट असल्याने या रिक्त जागेवरील निवडणूक लांबणीवर पडली होती. राज्य निवडणूक आयोगाने या रिक्तपदासाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे.
छिंदमने अहमदनगर येथील वरिष्ठस्तर दिवाणी न्यायालयात अर्ज दाखल करून नगरसेवक पद रद्दचा निर्णय स्थगित करावा तसेच निवडणुकीला स्थगिती देण्याची मागणी केली होती. मात्र न्यायालयाने छिंदम याच्या मागण्या फेटाळल्या आहेत.