Ahmednagar News : अकोलेच्या पश्चिमेला असणाऱ्या सह्याद्रीच्या पर्वत रांगेत आणि भंडारदरा धरणाच्या पाणलोटात अगदी शेवटच्या टोकाला साम्रद गावामध्ये एक आश्चर्य दडलेलं असून हे आश्चर्य नक्की काय आहे?
हे जाणून घेण्यासाठी हजारो पर्यटक साम्रदला गर्दी करत असतात. हे आश्चर्य दुसरे काही नसून जगातील सर्वात खोल दरी समजली जाणारी ‘सांदन दरी’ आहे.
अकोले तालुक्यातील पश्चिमेला असणाऱ्या सह्याद्रीच्या पर्वत रांगते निसर्गाचा खजिना दडलेला आहे. पावसाळ्यात पडणारा चार महिने धो-धो पाऊस, हिरवाईने नटलेले डोंगर, घनदाट जंगल, फेसळणारे धबधबे, उन्हाळ्यात,
पावसाळ्याच्या सुरुवातीची काजव्यांची चमचम, अशी विविध प्रकारचा खजिना सह्याद्रीच्या पर्वत रांगेत लपून बसलाय. त्यातच आणखी एक भर म्हणजे आशिया खंडातील सर्वात खोल समजली जाणारी सांदन दरीही या सह्याद्रीमध्ये आढळुन येते.
ही सांदन दरी पर्यटकांसाठी एक साहस असल्याने पावसाळा सोडता वर्षभर येथे गर्दीच असते. आशिया खंडातील सर्वात खोल दऱ्यांमध्ये ‘सांधण व्हॅली’ चा दुसरा क्रमांक लागतो. म्हणूनच ती पाहण्यासाठी जगभरातून पर्यटक गर्दी करतात.
एका अतिप्राचीन जिओग्राफिक फॉल्टलाईन म्हणजे जमिनीला पडलेली एक मोठी भेग, यामुळे निर्माण झालेली ही दरी किंवा घळ हा निसर्गाचा अद्भुत असा चमत्कारच आहे. सांदन दरी दोनशे ते चारशे फुट खोल आणि जवळ-जवळ ४ किमी लांबवर पसरलेली आहे.
सांदन दरीतल्या निमुळत्या वाटेवरून पुढे जात रात्री तिथेच मुक्काम करायचा हाच इथे आलेल्या अनेकांचा प्लॅन असतो. ही चिंचोळी वाट पुढे इतकी निमुळती होत जाते की, कित्येक ठिकाणी सूर्याचा प्रकाश जमिनीपर्यंत पोहचत नाही.
समोर आजोबा पर्वत, रतन गड आणि मागे अलंग-मदन-कुलंग गड आणि कळसुबाई शिखर सह्याद्रीच्या विशालतेची साक्ष देत असताना ही सांदन दरी सर करणे आपल्याला वाटते तितके सोपे नाही. पावसाळ्यात सांदन दरीला जाणे अशक्य असते.
कारण पावसाचे पाणी याच दरीतून वेगाने खाली कोसळते. त्यामुळे येथे जाण्याचा उत्तम कालावधी म्हणजे उन्हाळा किंवा हिवाळा. दुपारच्या प्रहरात दरीतील ऊन-सावल्यांचा खेळ बघण्यासारखा असतो.
दरीत गेल्यावर मार्गक्रमण करताना पाण्याचे दोन पुल लागतात. पहिला पुल २ ते ४ फुट आणि दुसरा पुल ४ ते ६ फुट पाण्यात असतो. हिवाळ्यात या पाण्याची पातळी थोडी अधिक असू शकते.
घळीच्या मुखाजवळच उजव्या हाताला पाणवठा आहे. नैसर्गिकपणे डोंगरातून झिरपणारे थंडगार नितळ पाणी म्हणजे जणू अमृतच ! माणसे आणि जनावरांसाठी दगड रचून वेगळी सोय केलेली दिसते. अतिशय अरुंद घळ, कधी आठ-दहा फूट तर कधी अगदीच जेमतेम एक माणूस जाईल,
एवढी तीन फूट रुंदी आणि दोन्ही बाजूंना अंगावर येणारा दगडी कमीतकमी दोनशे आणि जास्तीत जास्त चारशे फूट उंचीचा पाषाणकडा आहे. त्याच घळीतून खाली उतरत दरीच्या अगदी शेवटच्या मुखाशी जाता येते. अंदाजे या निमुळत्या घळीची लांबी एक किलोमीटर आहे.
त्यानंतर समोर विराट कोकण कड्याचा भाग दिसतो. एकदम हजार-दीडहजार फुटांचा ड्रॉप आणि समोर करुळ घाटाचा कडा आहे. सांधण घळीत पावसाळ्यात काही ठिकाणी बरेच पाणी भरते. त्यामुळे त्या जागा थोड्या जपूनच किंबहुना दोराच्या आधारानेच पार करण्याची गरज आहे.
सांधण व्हॅली’ला पोहचण्यासाठी अहमदनगर जिल्ह्यातील भंडारदरा धरणाच्या जलाशयाच्या कडेकडेने साम्रद या गावी पोहचावे लागते. पुण्यावरुन येणाऱ्या पर्यटकांसाठी आळेफाटा-संगमनेर-अकोले-राजूर- शेंडी (भंडारदरा)-उडदावणे-साम्रद, असा रस्ता आहे. मुंबईहुन येणाऱ्या साहसविरांना कल्याण-कसारा घाट-इगतपुरी-घोटी मार्गे शेंडीला पोहचता येते. तर नाशिकहूनही घोटी मार्गे येथे पोहचता येईल.