Ahmednagar news : नगर शहरात पावसाळ्यापूर्वी होणाऱ्या सिना नदी व नाले सफाई कामात दिरंगाई होत असल्याने तातडीने ही कामे व्हावीत, या मागणीचे निवेदन माजी महापौर भगवान फुलसौंदर यांनी मनपा आयुक्त डॉ.पंकज जावळे यांना दिले आहे.
या निवेदनात म्हटले आहे की, नगर शहरात १२ कि.मी. सीना नदीचे पात्र मध्य शहराच्या नागरी वसाहतीमधुन जात आहे. वास्तविक पाहता बुरुडगांव ते बोल्हेगांव अशा पद्धतीने नदी पात्र आहे. नदीच्या दोन्ही बाजूला लोक वस्ती असून, जुलै महिना संपत आला तरी देखील नाले सफाईचे काम अपूर्ण आहे.
नदी पात्रातून काढलेली झाडे-झुडपे, कचरा नदी पात्राच्या जवळच टाकल्याने पुन्हा पुरा सोबत वाहून जाण्याची शक्यता आहे. वास्तविक पाहता नालेसफाई बुरुडगांवकडून बोल्हेगांव कडे (खालील बाजूकडून वरील बाजूकडे) होणे गरजेचे आहे.
बुरुडगांव कडील बाजूची नाले सफाई झालेली नसल्यामुळे नदी पात्रातील झाडे-झुडपे व कचऱ्यामुळे नदी पात्रातील पाण्याचा फुगारा नागरी लोक वसाहतीमध्ये शिरण्याची शक्यता आहे. सुदैवाने अजून जास्त पावसाची सुरुवात झालेली नाही तरी अधिकच्या मशिनरी लावून नदी पात्र लवकरात लवकर साफ करुन घ्यावे, असेही निवेदनात म्हटले आहे.