अहमदनगर Live24 टीम, , 06 फेब्रुवारी 2022 :- बालविवाह करण्यास बंदी असूनही शेवगाव येथे कर्जबाजारीपणामुळे पालकांनीच त्यांच्या अल्पवयीन मुलीचा बालविवाह लावून देण्याचा प्रयत्न केला.
परंतु, चाईल्डलाईन संस्थेला याची माहिती मिळताच त्यांनी हस्तक्षेप केला. अन् अवघ्या १५ मिनिटांत हा बालविवाह होण्यापासून रोखण्यात यश आले.
४ फेब्रुवारीला एका जागरूक नागरिकाने चाईल्डलाईन संस्थेला १०९८ या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधून माहिती दिली की, रानेगाव, ता शेवगाव जि. अहमदनगर येथे पुढच्या पंधरा मिनिटात अवघ्या १४ वर्षीय अल्पवयीन मुलीचा बालविवाह होणार आहे. विशेष म्हणजे स्वतः आई वडीलच तिचा विवाह लावून देत आहेत.
तिचा विवाह हिवरा, ता. माजलगाव जि. बीड येथील २९ वर्षीय पुरुषाबरोबर होणार होता. या चिमुकल्या जीवांचा लग्नसोहळा कर्जबाजारी असलेले मुलीचे आई वडील लावून देत आहेत.
ही माहिती मिळताच चाईल्डलाईन टीम सदस्य प्रविण कदम यांनी शेवगाव पोलिस ठाण्यात संपर्क साधला. या बालविवाहाची माहिती दिली. तसेच रानेगावचे ग्रामसेवक तथा बाल विवाह प्रतिबंधक अधिकारी यांनाही माहिती दिली.
ही माहिती मिळताच बीड प्रशासनाकडून देखील बालविवाह थांबवण्यासाठी प्रयत्न सुरू झाले. यानंतर शेवगाव पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस उपनिरीक्षक बी. एस. बदडे, बालविकास अधिकारी बी. के. गडदे, एम. आर. बडे,
तालुका बाल संरक्षण समितीचे सदस्य ए. व्ही. पठाण, ग्रामसेवक तथा बाल विवाह प्रतिबंधक अधिकारी लांडे, रानेगावचे सरपंच व अध्यक्ष ग्राम बाल संरक्षण समिती यांनी घटनास्थळी धाव घेत हा विवाह रोखला.
या पथकाने मुलीच्या पालकांकडून बालविवाह प्रतिबंधाबाबतचे हमीपत्र लिहून घेतले. त्यानंतर बाल कल्याण समितीसमोर हजर राहण्याबाबत नोटीस बजावली. सोमवारी, ७ फेब्रुवारी रोजी ते बाल कल्याण समितीसमोर हजर होणार आहेत.