अहमदनगर Live24 टीम, , 07 फेब्रुवारी 2022 :- लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर बोलताना भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे आणि राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यात वाकयुद्ध रंगले होते. त्याचे पडसाद आता मतदारसंघातही उमटत आहेत.
विखेंच्या टीकेला उत्तर देताना सुळे यांनी खाल्ल्या मिठाला जाण्याची आमची संस्कृती आहे, असे सुनावले होते. त्यावरून आता विखे यांनी नाव न घेता टोला लगावला आहे.
विखे म्हणाले, ‘गोरगरीबांच्या मिठाला आम्ही जागतो म्हणूनच सामान्य माणूस आमच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहतो. परंतु, तुम्ही खाल्ल्या मिठाला जागत नाहीत म्हणून नगर दक्षिण मतदारसंघात तुम्हाला पराभव स्वीकारावा लागला,’ असा टोला डॉ. विखे यांनी लगावला आहे.
या दोन खासदारांच्या लोकसभेतील भाषणाची नगर जिल्ह्यात चर्चा सुरू आहे. त्यामुळेच डॉ. विखे यांनी एका कार्यक्रमात बोलताना खासदार सुळे आणि राष्ट्रवादीचा नामोल्लेख टाळून उत्तर दिले आहे.
शिर्डी विधानसभा मतदारसंघात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी बोलताना डॉ. विखे पाटील यांनी हे वक्तव्य केले. ते म्हणाले, ‘गोरगरीबांच्या मिठाला आम्ही जागतो.
म्हणूनच सामान्य माणूस आमच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहतो. त्याची पावती मोठ्या मताधिक्याच्या रूपाने आम्हाला मिळते. संसदेमध्ये सामान्य माणसाचीच बाजू आपण प्रामाणिकपणे मांडतो.
यावर कोण काय बोलतंय, याला मी फारसे महत्त्व देत नाही. शिर्डी विधानसभा मतदारसंघात मागील अनेक वर्षांपासून सामान्य माणसासाठी काम करण्याची परंपरा अखंडपणे सुरू आहे.
सामान्य माणसाच्या खाल्ल्या मिठाला आम्ही जागत असल्यामुळेच जनता आमच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहते. सामान्य माणसाला विखे पाटील कुटुंबीयांचा आधार वाटतो.
परंतु, तुम्ही खाल्ल्या मिठाला जागत नाहीत. म्हणून नगर दक्षिणमध्ये तुम्हाला पराभव स्वीकारावा लागला, असा टोलाही डॉ. विखे यांनी लगावला.