अहमदनगर Live24 टीम, 12 जून 2021 :- पारनेर तालुक्यातील मौजे माळकुप येथील झेडपी शाळेची इमारत पाडण्यास जबाबदार असलेल्या सरपंचाची चौकशी करुन, त्याचे सरपंच पद रद्द करावे अशी मागणी अन्याय निवारण निर्मुलन सेवा समितीच्या वतीने करण्यात आली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे कि, पारनेर तालुक्यातील मौजे माळकुप येथील शासकीय मालकी हक्क असलेल्या जागेत जिल्हा परिषदेची शाळा आहे. कुठल्याही नियमांचे पालन न करता व कुठल्याही सदस्यांना पूर्व कल्पना न देता अनाधिकृतपणे गावाचे सरपंच यांनी जेसीबीच्या सहाय्याने सदर शाळेची इमारत पाडली.
सरपंचाने मनमानी कारभाराचे कृत्य करुन शाळेची इमारत पाडली आहे. तेथील उपसरपंच राहुल घंगाळे यांनी सदर प्रकरणाची तक्रार पंचायत समितीकडे केली आहे. एखाद्या शाळेची इमारत पुर्वपरवानगी न घेता पाडणे ही गंभीर बाब आहे.
सदर प्रकरणाची प्रशासकीय स्तरावर चौकशी करुन यामध्ये दोषी असलेल्या सरपंचावर कारवाई करुन त्याचे सरपंच पद रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे.
सदर प्रकरणी कारवाई न झाल्यास संघटनेच्या वतीने ग्रामस्थांबरोबर जिल्हा परिषद कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे.