अहमदनगर Live24 टीम, 13 जानेवारी 2021 :- नेहमीच लहान-मोठे अपघात होणार्या नगर-जेऊर-कोल्हार घाटाचे रुंदीकरण करण्याच्या मागणी जय हिंद सैनिक सेवा फाउंडेशनच्या वतीने करण्यात आली.
या मागणीचे निवेदन फाऊंडेशन व ग्रामस्थांच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहाय्यक अधिक्षक अभियंता ए.जी. मेहेत्रे यांना देण्यात आले. यावेळीय फाऊंडेशनचे अध्यक्ष शिवाजी पालवे, भगवान डोळे, अनिल पालवे, भाऊसाहेब देशमाने, बन्सी दारकुंडे आदी उपस्थित होते.
नगर जिल्ह्यातील नगर तालुक्यामधून जेऊर ते कोल्हारला जाणारा कोल्हार घाटचा रस्ता तसेच नगर-अगडगाव येथून कोल्हारला जाणारा हा रस्ता असून, या रस्त्याची रुंदी अत्यंत कमी आहे. या घाटातून कोल्हार, उदरमल, सोकेवाडी, शिराळ, चिचोंडी, डमाळवाडी, गितेवाडी, धारवाडी, डोंगरवाडी, लोहसर, कडगाव, राघूहिवरे, मिरी, मोहज तसेच पाथर्डी व शेवगाव तालुक्यात जाण्यासाठी हा कमी अंतराचा रस्ता मानला जातो.
या भागामध्ये राष्ट्रसंत आनंदऋषी महाराज, तीर्थक्षेत्र कोल्हुबाई गड, काळभैरवनाथ देवस्थान, महादेव मंदिर सारखे अनेक धार्मिक स्थळ आहे. या घाटातून अनेक भक्त व दोन तालुक्यातील नोकरदार, व्यावसायिक मोठ्या संख्येने रहदारी करीत असतात. या रस्त्यावर रहदारी वाढली असून, घाटाची रुंदी कमी असल्यामुळे अनेक अपघात होत आहे. येणार्या-जाणर्यांना जीव मुठीत धरुन मोठी कसरत करावी लागत असल्याचे निवेदनात म्हंटले आहे.
सदरील कोल्हार घाटचा रस्ता अंदाजे दोन ते तीन किलोमीटर असून, या रस्त्याचे रुंदीकरण झाल्यास नागरिकांची मोठी सोय होणार आहे. तर येथे होणारे अपघात देखील कमी होणार आहे. या प्रश्नाची तातडीने दखल घेऊन नगर-जेऊर-कोल्हार घाटाचे रुंदीकरण करण्याची मागणी जय हिंद सैनिक सेवा फाउंडेशन व ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली आहे.