दिल्लीतील शेतकर्‍यांच्या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालया समोर धरणे व निदर्शने

अहमदनगर Live24 टीम, 14 डिसेंबर 2020 :-केंद्र सरकारने शेतकर्‍यांचे आणि ग्राहकांची लूट करण्याच्या हेतूने कॉर्पोरेट कंपन्यांचा फायदा करून देणारे तीन जनविरोधी कृषी कायदे संसदेत पारित केले आहे.

हे कायदे रद्द होण्यासाठी दिल्लीत सुरु असलेल्या शेतकर्‍यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवित किसान, कामगार आणि कर्मचारी संघटना संयुक्त कृती समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालया समोर धरणे आंदोलन करुन निदर्शने करण्यात आली. तर शेतकरी विरोधी असलेले तीन नवीन कृषी कायदे त्वरीत रद्द करण्याची मागणी करण्यात आली.

या आंदोलनात हमाल पंचायतचे अध्यक्ष अविनाश घुले, भाकपचे राज्य सहसचिव अ‍ॅड.कॉ. सुभाष लांडे, अ‍ॅड.कॉ. सुधीर टोकेकर, बहिरनाथ वाकळे, अर्शद शेख, अशोक बाबर, महादेव पालवे, भाऊसाहेब थोटे, कॉ. महेबुब सय्यद, अंबादास दौंड, लहू लोणकर, संतोष गायकवाड, रामदास वागस्कर, दत्ताभाऊ वडवणीकर, बाळासाहेब सागडे,

चंद्रकांत माळी, गणेश माळी आदि सहभागी झाले होते. नव्याने पारित करण्यात आलेल्या शेतकरी विरोधी तीन नवीन कृषी कायद्याच्या विरोधात देशभरातील शेतकरी अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीच्या नेतृत्वाखाली दिल्ली येथे गेल्या 18 दिवसांपासून आंदोलन करीत आहे. शेतकर्‍यांनी उपोषण सुरु केले असून,

या आंदोलनाची केंद्र सरकारने दखल न घेतल्यामुळे सोमवारी (दि.14 डिसेंबर) रोजी देशभरातील जिल्हाधिकारी कार्यालया समोर धरणे आंदोलन व निदर्शने केले जात असल्याच्या पार्श्‍वभूमीवर किसान, कामगार आणि कर्मचारी संघटना संयुक्त कृती समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालया समोर निदर्शने करण्यात आली.

यावेळी केंद्रातील भाजप सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. या आंदोलनात दहा केंद्रीय कामगार संघटना, देशभरातील विविध उद्योगांतील कामगार आणि कर्मचारी फेडरेशन यांनी पाठिंबा दिला असल्याचे स्पष्ट करण्यात आले.

तातडीने केंद्र सरकारने शेतकरी विरोधी असलेले नवीन तीन कृषी कायदे रद्द करावे आणि विजेचे खाजगीकरण करणारे विधेयक मागे घेण्याची मागणी करण्यात आली. शेतकर्‍यांचे प्रश्‍न केंद्र सरकारने तातडीने न सोडविल्यास जिल्ह्यातील शेतकरी रस्त्यावर उतरुन आंदोलन करणार आहे.

शेतकर्‍यांच्या प्रश्‍नाकडे डोळेझाक करणार्‍या केंद्र सरकारच्या विरोधात प्रत्येक शासकीय कार्यालयात ठिय्या आंदोलन व खासदारांच्या घरावर मोर्चा काढण्याच्या तयारीत शेतकरी असल्याची माहिती अ‍ॅड.कॉ. सुभाष लांडे यांनी दिली.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

Recent Posts