अहमदनगर बातम्या

नगर दक्षिण लोकसभेसाठी आमदार निलेश लंके यांच्याच नावाची चर्चा ! राऊतांच्या गडाख यांच्या पर्यायाने नगरच्या राजकारणात मोठा पेंच

Ahmednagar Politics : आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अहमदनगरच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत आहेत. नुकत्याच काही दिवसांपूर्वी आमदार निलेश लंके यांच्या अर्धांगिनी राणी लंके यांनी लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. तसेच काल अर्थातच सोमवारी नाशिक दौरा आटोपून अहमदनगर मध्ये साई दर्शनासाठी आलेल्या ठाकरे गट शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी अहमदनगर दक्षिणसाठी माजी मंत्री गडाख हे सर्वोत्कृष्ट असल्याचे म्हटले आहे.

यामुळे अहमदनगर जिल्ह्यातील नगर दक्षिण मतदारसंघासाठीच्या दावेदारांची आणि इच्छुकांची संख्या वाढत चालली आहे. खरे तर अहमदनगर दक्षिण मतदारसंघातून सध्या राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे सुपुत्र डॉक्टर सुजय विखे पाटील हे खासदार आहेत. विशेष म्हणजे आगामी लोकसभा निवडणुकीत देखील भाजपाकडून सुजय विखे पाटील हेच प्रबळ दावेदार असल्याचे बोलले जात आहे.

दुसरीकडे या जागेवर आता इंडिया आघाडीत समाविष्ट असलेल्या पक्षांकडून देखील वेगवेगळ्या उमेदवारांची नावे पुढे केली जात आहेत. शिर्डीला साई दर्शन घेतल्यानंतर ठाकरे गट शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी माजी मंत्री शंकरराव गडाख हे या जागेसाठी सर्वात योग्य आणि प्रबल उमेदवार असल्याचे म्हटले आहे. मात्र या सर्वांमध्येच आमदार निलेश लंके यांच्या नावाची या जागेसाठी सर्वाधिक चर्चा होत आहे.

खरेतर नुकत्याच काही दिवसांपूर्वी राणी लंके यांनी आम्ही लोकसभा निवडणुकीसाठी तयारी सुरू केली असल्याचे सुतोवाच केले होते. विशेष म्हणजे जर तिकीट मिळाले नाही तर अपक्ष लढण्याची तयारी असल्याचे देखील त्यांनी स्पष्ट केले होते. विशेष म्हणजे राणी लंके यांनी दावेदारी ठोकण्यापूर्वी आमदार निलेश लंके यांचे देखील नाव या मतदारसंघासाठी पुढे आले होते. परंतु राष्ट्रवादीत उभी फूट पडल्यानंतर लंके यांचे नाव काहीसे मागे पडले आहे.

पण, लंके यांच्या धर्मपत्नी राणी लंके यांनी लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली असल्याने तसेच यासाठी तिकीट मिळाले नाही तर अपक्ष लढू असा निर्धार केला असल्याने पुन्हा एकदा लंके दांपत्याच्या या जागेसाठी चर्चा सुरू झाल्या आहेत. शिवाय, आघाडीकडून या जागेवर निवडणुक लढवण्यासाठी शरद पवार हे उत्सुक आहेत. पवारांनी आमदार रोहित पवार, आमदार प्राजक्त तनपुरे यांची नावे आधीच चर्चेत आणलेली आहेत.

मात्र हे सर्व खरं असलं तरी देखील आमदार निलेश लंके यांच्या भूमिकेवरच या जागेच्या उमेदवाराची निवड होणार असे चित्र आहे. खरे तर पवार 2019 मध्ये झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत नगर दक्षिण मधला राष्ट्रवादीचा पराभवाचा वचपा काढणार आहेत. यामुळे उमेदवार कोण या पेक्षा तो राष्ट्रवादीकडून असावा अन या जागेवर हमखास निवडून येणारां असावा यावर शरद पवारांचा अधिक भर राहणार आहे.

यामुळे आमदार लंके हे या निकषात परिपूर्ण असून लंके आता काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष राहणार आहे. विशेष म्हणजे संजय राऊतानी आघाडीकडून शिवसेनेचा उमेदवार या जागेसाठी उभा करण्याचे नुकतेच जाहीर केले असून त्यांनी गडाख यांचा पर्याय दिला आहे, मात्र या जागेवर शरद पवारांचे विशेष प्रेम आहे यामुळे संजय राऊत यांचा हा पर्याय आघाडीला पचणार का हे देखील पाहण्यासारखे राहणार आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts