Rekha Jare Murder Case : बहुचर्चित रेखा जरे हत्याकांडाची सुनावणी जिल्हा न्यायालयात सुरूआहे. दोन दिवसापूर्वी साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात आली. काल (दि.९ डिसेंबर) साक्षीदारांची उलट तपासणी न्यायालय होती.
यावेळी वकील व रेखा जरे यांच्या आई प्रथमदर्शनी साक्षीदार सिंधूबाई वायकर यांत शाब्दिक चकमक उडाली होती. तुम्ही काहीपण विचारू नका हो, माझ्या लेकीचा जीव माझ्यादेखत गेलाय असे त्यांनी वकिलांना सुनावले.
नेमके काय घडले ?
आरोपींच्या वकिलांनी प्रश्न केला की, रेखा जरे यांना उपचारांसाठी जिल्हा रुग्णालयात आणल्यावर तेथे तुम्हाला पोलिस दिसल्यावर, तुम्ही काय घडले, ते त्यांना सांगायला लागल्या का? या प्रश्नावर त्या म्हणाल्या की, पोलिसांनी ज्यावेळी मला विचारले, त्यावेळी मी त्यांना घटना सांगितली, असे सांगत ‘पण तुम्ही काहीपण विचारू नका हो, माझ्या लेकीचा जीव माझ्यादेखत गेलाय’ असे उत्तर देत वकिलांना सुनावले. उलटतपासणीवेळी आरोपींच्या वकिलांच्या प्रश्नांमुळे वायकर व वकिलांमध्ये शाब्दिक वाद झाले. न्यायाधीश गोसावी यांनी अखेर त्यांना शांत केले.
वायकर यांनी काय दिली उत्तरे?
सिंधूबाई वायकर यांनी न्यायालयात ‘आरोपीने रेखावर चाकूने वार केला, ती जखमी झाल्यावर तिला मी, विजयमाला माने व कुणाल जरे अशा तिघांनी गाडीतच आतल्या आत शेजारच्या सीटवर बसवले. कुणालने त्याच्या मोबाइलमध्ये मारेकऱ्याचा फोटो काढला. रेखावर हल्ला झाल्यावर तिला रुग्णवाहिकेतून नेत असताना, माझी अवस्था चांगली नव्हती व मला उठताही येत नसल्याने मी तिच्यासमवेत रुग्णवाहिकेतून गेले नाही. पोलिस माझा जबाब घेत असताना तेथे विजयमाला माने व कुणाल नव्हते, अशी उत्तरे दिली आहेत.
पुढील सुनावणी कधी ?
सध्या रेखा जर हत्याकांड खटल्यातील फिर्यादी व प्रत्यक्षदर्शी साक्षीदार सिंधूबाई वायकर यांची साक्ष नोंदवली जात असून शुक्रवारी अॅड. परिमल फळे, अॅड. सुनील मगरे व अॅड. महेश तवले यांनी त्यांची उलट तपासणी केली. आता पुढील सुनावणी सोमवारी होणार आहे.