अहमदनगर बातम्या

दूधगंगा पतसंस्था आर्थिक अपहार प्रकरण : एक महिन्याच्या आत आरोपींना अटक होणार…

Ahmednagar News : संगमनेर येथील दूधगंगा पतसंस्थेतील अपहार प्रकरणातील आरोपींना अटक करावी व ठेवीदारांचे पैसे मिळावे, या मागणीसाठी दुधगंगा पतसंस्था ठेवीदार संघर्ष समितीच्या वतीने प्रांताधिकारी कार्यालयासमोर सुरू करण्यात आलेले जनआक्रोश व उपोषण आंदोलन आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलीस अधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर काल गुरुवारी सहाव्या दिवशी स्थगित करण्यात आले.

दूधगंगा पतसंस्थेतील आर्थिक अपहारा प्रकरणी गुन्हा दाखल होऊनही व न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळूनही मुख्य सूत्रधार व त्याच्या कुटुंबीयांना अद्याप अटक न झाल्याने ठेवीदार संतप्त झाले होते.

सर्व आरोपींना अटक करावी, या मागणीसाठी त्यांनी प्रांत अधिकारी कार्यालयासमोर बेमुदत जनआक्रोश व उपोषण आंदोलन सुरू केले होते. या आंदोलनादरम्यान विविध मान्यवरांनी भेट देऊन ठेवीदारांना पाठिंबा दर्शवला.

सहकारी संस्था उपनिबंधक कोरे, पतसंस्थेच्या प्रशासक मंडळाचे अध्यक्ष अमोल वाघमारे व आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन चर्चा केली. आर्थिक अपहारातील आरोपींना अटक होईपर्यंत आंदोलन मागे घेतले जाणार नाही, अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी घेतली.

एक महिन्याच्या आत आरोपींना अटक करण्यात येईल, असे आश्वासन आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी दिले. प्रशासक मंडळाचे अध्यक्ष वाघमारे यांनीही होत असलेल्या कारवाईबाबत लेखी पत्र दिले. यानंतर हे आंदोलन तूर्त स्थगित करण्यात येत असल्याचे जाहीर करण्यात आले. आरोपीला अटक न झाल्यास पुन्हा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा यावेळी आंदोलनकर्त्यांनी दिला.

खासदार सदाशिव लोखंडे यांनी आश्वासन दिल्याप्रमाणे मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन दूधगंगा पतसंस्थेतील आर्थिक अपहाराबाबत मुख्यमंत्र्यांना पत्र दिले. संभाजीनगर येथील येथील आदर्श पतसंस्थेमध्ये झालेल्या गैरव्यवहार प्रकरणाच्या धर्तीवर दूधगंगा पतसंस्थेमधील अपहरकर्त्यांचा शोध घ्यावा, अशी मागणी खासदार लोखंडे यांनी या पत्राद्वारे केली. मुख्यमंत्र्यांनी तात्काळ याबाबत सहकार खात्याच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.

आर्थिक गुन्हे शाखेकडून ४ संचालकांचे जबाब

दूधगंगा पतसंस्थेतील आर्थिक अपहार प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेच्या वतीने दूधगंगा पतसंस्थेच्या चार संचालकांना समन्स बजावण्यात आले होते. त्यानुसार काल गुरुवारी या संचालकांनी अहमदनगर येथे हजेरी लावली. यावेळी आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी या संचालकाचे जबाब नोंदविले. त्यामुळे पतसंस्थेच्या संचालकांमध्ये खळबळ उडाली आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts