Ahmednagar News : पाथर्डी तालुक्याला पूर्ण वेळ तहसीलदार नाही, चार महिन्यांपासून संजय गांधी योजनेच्या नायब तहसीलदारांची बदली होऊन त्यांच्या जागी नव्याने नियुक्ती तर सोडाच,
दुय्यम दर्जाच्या कर्मचाऱ्यांकडे अतिरिक्त पद्भार सोपवल्याने संजय गांधी विभागातील शेकडो प्रकरणे प्रलंबित राहत आहेत.
दाखल प्रकरणांचा अचूक आकडासुद्धा कुणाला सांगता येत नाही. सर्वात धक्कादायक म्हणजे संजय गांधी योजनेची समितीच दोन वर्षांपासून अस्तित्वात नाही. संजय गांधी निराधार योजना, इंदिरा गांधी वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना,
श्रावण बाळ योजना व अन्य शासकीय योजनांची प्रकरणे गेल्या चार महिन्यांपासून पडून आहेत, काही प्रकरणे सेतूकडून तहसीलच्या संगणकात, काही प्रस्ताव टपालात,
काही प्रस्ताव तहसीलदारांच्या टेबलावर, तर काही प्रस्ताव अपूर्ण व चुकीच्या कागदपत्रांच्या गडुयात, असे चित्र असून, कशाच्याच कशाला मेळ नाही.
आज दुपारी संजय गांधी योजना कार्यालयात चौकशी करणाऱ्यांची गर्दी होती. उपस्थित दोनच कर्मचारी आणि दोघे जेवायला गेलेले, असे सांगण्यात आले. मंजूर सात कर्मचाऱ्यांपैकी चार जण आहेत. त्यांच्याकडे अन्य कामाचा अतिरिक्त पद्मार असल्याने कोणते काम करावे,
संगणकावर काय उत्तर द्यावे, समोर उभे असलेल्या गरजूंना काय उत्तर द्यावे, असा प्रश्न पडून सर्वांचा गोंधळ, चिडचिड, हताशपणे, असे चित्र बघायला मिळाले.
उपस्थित कर्मचाऱ्यांच्या निरीक्षणानुसार पाचशेहून अधिक प्रस्ताव प्रलंबित आहेत. काही प्रस्ताव सहीसाठी पाठवले आहेत तर अजून काही दाखल झालेल्यांची वर्गवारी,
नोंदणी झालेली नाही, असे सांगण्यात आले. गेल्या आठवड्यात तहसीलदारांची बदली होऊन त्यांनी तत्काळ पद्भार सोडला. त्यांचा पद्मार अजून कुणाकडे सोपवला नसून त्यांच्या जागी नवीन नवीन नियुक्ती प्रलंबित आहे.
एका बाजूने पाणीटंचाई वाढत आहे, दुसऱ्या बाजूने पुरवठा विभागातील गैरप्रकार चर्चेचा विषय ठरला असून, एजंटांकडून गरजूंची होणारी अडवणूक, नवीन शिधापत्रिका काढणे, जुन्या ऑनलाइन , हे करणे, अशी कामे कधी होतील कोणीच सांगू शकत नाही.
कर्मचारी आजारी रजेवर तर पासवर्ड त्यालाच माहीत असल्याने ते हजर झाल्यावर काम होईल, असे उत्तरसुद्धा गरजूंच्या अंगवळणी पडले आहे.
आमचे काम झाले का, पैसे कधी सुरू होतील, अशी विचारणा करण्यासाठी वारंवार उपाशीपोटी ग्रामीण भागातून माणसे येतात, त्यांना प्रवास खर्च व अन्य खर्चासाठीसुद्धा उधारी उसणवारी करून यावे लागते.
एवढी वाईट स्थिती आहे. काही गरजू तर दिवसभर पोर्चमध्ये बसून येणाऱ्या जाणाऱ्यांना प्रकरणाचे स्टेटस विचारतात. उद्धव ठाकरे यांचे सरकार जाऊन एकनाथ शिंदे यांचे सरकार आले, त्यामुळे सर्व समित्या बरखास्त झाल्या.
आता सर्वत्र विधानसभा निवडणुकीचे वेध लागले असताना समित्यांची नियुक्ती नाही. अशी अवस्था आहे. याबाबत नायब तहसीलदार भानुदास गुंजाळ यांच्याशी चर्चा केली असता, ते म्हणाले, तहसीलदारांनी पद्मार सोडून ते बदलीच्या ठिकाणी हजर झाले.
संजय गांधी नायब तहसीलदारांचा पद्मार नायब तहसीलदार श्री. बागुल यांच्याकडे आहे. संजय गांधी योजनेबाबतची बैठक कधी होईल व प्रस्तावांबाबतची माहिती ते देऊ शकतील.
जेवणासाठी ते गेले आहेत. त्यांनी ज्या कर्मचाऱ्यांचे नाव सांगितले ते कर्मचारी म्हणाले, सर्व प्रस्तावांची अपडेट माहिती सोमवारपर्यंत देतो.
रेकॉर्ड करण्याचे काम माझ्याकडेसुद्धा अतिरिक्त आहे. डिसेंबर महिन्यात यापूर्वी समितीची बैठक झाली होती. ते प्रस्ताव सहीसाठी टेबलवर पडून आहेत.