अहमदनगर बातम्या

पाकिस्तानातून आलेले धुळीच वादळ थेट नगर जिल्ह्यात ! नागरिकांना सूचना..

अहमदनगर Live24 टीम, 23 जानेवारी 2022 :- पाकिस्तान देशात निर्माण झालेल्या धुळीच्या वादळाचा फटका महाराष्ट्रालाही बसत आहे. गुजरात मार्गे आलेल्या धुळीचे साम्राज्य महाराष्ट्रात पोहचले असून आज रविवारी (दि.२३) ते नगर जिल्ह्यातही सर्वत्र पसरले आहे.

त्यामुळे वातावरण प्रदूषित झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून निसर्गाने थंडी, पावसाची बरसात सुरु केली आहे. गेल्या महिनाभरापासून महाराष्ट्रासह देशभरात कुठे दाट धुके, कुठे अवकाळी पाऊस तर कुठे कडाक्याची थंडी पडत आहे.

त्यात आता हे धुळीचे वादळ आले आहे. आज (रविवार) तर पाकिस्तानातून सुटलेल्या धुळीचे वादळ थेट महाराष्ट्रात धडकले आहे.

पाकिस्तानकडून निघालेले हे धुळीचे वादळ गुजरात, अरबी समुद्रमार्गे महाराष्ट्रापर्यंत पोहोचले आहे. यामुळे कोकणात पाऊस तर मुंबई, पुण्यासह महाराष्ट्रात थंड वारे सुरु झाले आहेत.

यामुळे उत्तर कोकण आणि मध्य महाराष्ट्रात धुळीचं साम्राज्य पसरलं आहे. याशिवाय मुंबई-पुण्यात धुलीकणांचे प्रमाण वाढल्याची नोंद झाली आहे.

यामुळे वाहन चालविताना चालकांनी तसेच श्वसनाचे विकार असलेल्यांनी विशेष काळजी घ्यावी असा सल्ला देण्यात आला आहे. हे धुळीचे वादळ असल्याने पाकिस्तानातून आलेले धुलीकण हवेत पसरले आहेत.

यामुळे समोरचे दिसणे कमी झाले आहे. शिवाय अधूनमधून ढगही ये-जा करत आहेत. यामुळे सूर्यप्रकाशही कमी प्रमाणात पसरला आहे. धुळीचे वातावरण निर्माण झाल्याने नागरिकांना मास्क घालण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

तसेच, विनाकारण घराबाहेर न पडण्याचे आवाहन देखील करण्यात आले आहे. हे वातावरण पुढील दोन दिवस राहण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts