अहमदनगर बातम्या

अहमदनगरमध्ये खा. विखे राबविणार आजोबांचा हा राजकीय प्रयोग

अहमदनगर Live24 टीम, 28 मार्च 2022 Ahmednagar Politics :- जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते बाळासाहेब विखे पाटील आपल्या वेगळ्या राजकारणासाठी ओळखले जात होते. काँग्रेसमध्ये असूनही सर्वच पक्षातील नेते आणि कार्यकर्त्यांशी त्यांचा मोठा संपर्क होता.

‘विखे यंत्रणा’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या व्यवस्थेला ‘जिल्हा विकास आघाडी’ असे अधिकृत राजकीय स्वरुपही देण्यात आले होते.

त्या माध्यमातून पक्ष बाजूला ठेवून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढण्याचा प्रयोग विखे पाटलांनी दीर्घकाळ केला. आता त्यांचे नातू नगरचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनीही हाच मार्ग चोखाळण्याचे ठरविले आहे.

येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत ही जिल्हा विकास आघाडी पुनरुज्जीवित करून निवडणुका लढविण्याचे संकेत त्यांनी दिले आहेत. सध्या विखे भाजपमध्ये आहेत.

त्यामुळे पक्षशिस्तीप्रमाणे त्यांना वरिष्ठ नेत्यांना विश्वासात घेऊनच हा प्रयोग करावा लागणार आहे. यासंबंधी बोलताना डॉ. विखे म्हणाले की, ‘स्थानिक स्वराज्य संस्थांचे राजकारण आणि निवडणुकाही थोड्या वेगळ्या असतात.

सध्याची राजकीय स्थिती पाहिली तर इतर अनेक पक्षातील कार्यकर्ते आमच्यासोबत येण्यास तयार आहेत. मात्र, त्यांना पक्षीय अडचण येत आहे. त्यामुळे जिल्हा विकास आघाडी हा पक्षविरहित प्रयोग करून आपल्या विचारांची माणसे जोडून सत्ता मिळविण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत.

अर्थात हे सर्व पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांच्या परवानगीनेच केले जाईल,’ असेही विखे यांनी सांगितले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजप विरूद्ध महाविकास आघाडी असा सामना रंगणार का? याकडे लक्ष लागले होते.

त्यात आता डॉ. विखे यांनी या जिल्हा विकास आघाडीचा प्रयोग करण्याचे ठरविल्याने महाविकास आघाडीमध्येच मोठी फाटाफूट होण्याची शक्यता आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts