Ahmednagar News : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर राहुरी येथील मुळा-प्रवरा कार्यालयात खासदार डॉ. सुजय विखे पाटील व जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष शिवाजीराव कर्डिले यांच्या उपस्थितीत आढावा बैठक झाली.
बैठकीत खासदार डॉ. सुजय विखे म्हणाले की, निळवंडे धरण कालव्यांचे लोकार्पण, विमानतळाच्या इमारतीचे भूमीपूजन, साई संस्थानच्या दर्शन कॉम्प्लेक्सचे उद्घाटन असे कार्यक्रम पंतप्रधानांच्या उपस्थित होणार असून या कार्यक्रमाला केंद्र व राज्य सरकारच्या योजनांचे लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित राहावेत,
यासाठी पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी गावपातळीवर प्रयत्न करण्याचे आवाहन केले. तसेच विविध योजनांच्या लाभार्थ्यांना लाभाचे वाटपही करण्यात येणार आहे.
विशेष म्हणजे केंद्र शासनाच्या विविध योजनांचा लाभ राहरी तालुक्यातील हजारो नागरिकांनी घेतला असून सर्व लाभार्थ्यांनी पंतप्रधानांचा हा नियोजित दौरा व्यवस्थितपणे पार पडावा, या उद्देशाने कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे आवाहन केले.
कर्डिले म्हणाले, पंतप्रधान मोदींनी सर्वसामान्य नागरिकांना लाभ होईल, अशा योजना राबविल्या आहेत. अनेक लाभार्थ्यांना याचा लाभ झाला आहे. त्यामुळे सर्वांनी सभेला उपस्थित राहावे, असे आवाहन त्यांनी केले.
प्रधानमंत्री आयुष्यमान भारत, महिला बचत गट अशा विविध योजनांच्या लाभार्थ्यांना कार्यक्रमस्थळी आणण्यासाठीची जबाबदारी सर्व कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी चोखपणे पार पाडावी, अशा सूचना खासदार डॉ. विखे यांनी केल्या. बैठकीस तालुक्यातील भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते.