अहमदनगर Live24 टीम, 30 सप्टेंबर 2021 :- राज्यातील महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या, मंत्र्यांच्या विरुद्ध केंद्रीय तपास यंत्रणेच्या माध्यमातून ओढून ताणून केसेस केल्या जात आहेत. महाविकास आघाडीच्या नेत्यांना जाणीवपूर्वक बदनाम करण्याचे षड्यंत्र यामागे आहे,
असा थेट आरोप करीत ईडी, सीबीआय भाजपाची कार्यालय झालीत. अशी कडवी टीका राज्याचे जलसंपदा मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली.
काल ते पत्रकारांसोबत बोलत होते. यावेळी ते म्हणाले की,राज्यातील महावकास आघाडी सरकारमधील मंत्री आणि नेते यांच्या संदर्भात केंद्रीय तपास यंत्रणांकडून कारवाया होत आहेत.
भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी पुढील काही दिवसात राज्यातील आणखी काही मंत्री रुग्णालयात असतील,असे वक्तव्य केले होते. याकडे लक्ष वेधले असता जलसंपदा मंत्री पाटील म्हणाले, केंद्रीय तपास यंत्रणा कारवाई करणार हे त्यांना आधीच कसे माहीत?
या यंत्रणा भाजपचे कार्यालय झाले आहे का? माजी मंत्री खडसे यांच्या बाबतीत उहापोह केल्या जाणाऱ्या जमिनीचे पेमेंट चेक आणि आरटीजीएसद्वारे करण्यात आले आहे. तरी मनी लॉन्ड्रिंगचा आरोप केला जात आहे. ग्रामविकासमंत्री यांच्याकडूनही कोणताही गुन्हा घडला नाही, घडलेला नाही.
कागल परिसरातील एका प्रकल्पाच्या पाहण्यासाठी आपण काही दिवसापूर्वी गेलो होतो. त्यावेळी तेथील शेतकऱ्यांनी या कारखान्यासाठी आम्ही एक दिवसात १८ कोटी रुपये भागभांडवल म्हणून जमा केल्याचे सांगितले. उर्वरित रक्कम एका महिन्यात उभी केली.
एकूणच आघाडी महाविकास आघाडीच्या नेत्यांवर ओढून ताणून केसस केल्या जात आहेत. यामागे जाणीवपूर्वक बदनामीचे षड्यंत्र आहे.
ज्यांना केंद्रीय तपास यंत्रणांनी नोटिसा दिल्या आणि नंतरच्या काळात जे भारतीय जनता पक्षात गेले, त्याचे काय झाले ? असा प्रतिप्रश्न ही जलसंपदा मंत्री पाटील यांनी केला.