Ahmednagar News : नगर अर्बन मल्टीस्टेट शेड्युल्ड बँक वाचवण्यासाठी पुन्हा प्रयत्न सुरू झाले आहेत. सत्ताधारी संचालक बँक बचाव समिती यासाठी एकत्रित पाठपुरावा व प्रयत्न करणार आहेत. नुकत्याच झालेल्या संयुक्त बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. बैठकीत केंद्रीय सचिवांकडे दाखल केलेल्या अपिलाच्या मसुद्यावर चर्चा करण्यात आली.
बँकेचे सभासद राजेंद्र चोपडा यांच्या निवासस्थानी बैठक झाली. बैठकीत बँकेचे लायसन्स परत मिळविणे किंवा बँकिंग परवाना रद्दच्या आदेशाला स्थगिती मिळविणे, या मुद्यांवर चर्चा झाली.
यावेळी विद्यमान अध्यक्ष अशोक कटारिया, माजी अध्यक्ष राजेंद्र अग्रवाल, तसेच संचालक मंडळ सदस्य अनिल कोठारी, शैलेश मुनोत, अजय बोरा, दीपक गांधी, मनेश साठे, गिरीश लाहोटी, अँड. केदार केसकर, किशोर बोरा, बँक बचाव समितीतर्फे बँकेचे माजी संचालक राजेंद्र गांधी, राजेंद्र चोपडा, वसंत लोढा, अँड. अच्युत पिंगळे, सीए राजेंद्र काळे, मनोज गुंदेचा, डीएम कुलकर्णी आदी उपस्थित होते.
बँकिंग रेग्युलेशन अॅक्टच्या कलम २२ (५) अन्वये रिझर्व बँकेच्या आदेशाविरुद्ध केंद्रीय अर्थ मंत्रालयांच्या सचिवांकडे अपील करण्याची तरतूद आहे. त्याप्रमाणे बँकेच्या संचालक मंडळाने संचालक ईश्वर बोरा यांना अधिकृत प्रतिनिधी नेमून त्यांच्या नावाने अपील दाखल केले आहे.
यापूर्वी संचालक मंडळाने उच्च न्यायालयात दाखल केलेले म्हणणे, तसेच रिझर्व बँकेच्या ७ जुलै २०१२ च्या कारणे दाखवा नोटिसीला दिलेले लेखी उत्तर समाधानकारक नसल्यामुळे ते ग्राह्य नव्हते. त्यामुळे बँकेचे लायसन्स रद्द झाले.
या पार्श्वभूमीवर केलेल्या अपिलाद्वारे बँक वाचविण्याची शेवटची संधी वाया जावू नये, या भावनेतून बँक बचाव समितीचे राजेंद्र गांधी यांनी अपिलाचा मसुदा यशस्वी होण्यासाठी त्यावर एकत्र चर्चा करून त्या मसुद्यामध्ये योग्य बदल सुचविण्यासाठी बँकेचे संचालक मंडळ बैंक बचाव समितीची संयुक्त बैठक घेण्याचे आवाहन केले. या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत ही बैठक नुकतीच झाली.