Grampanchayat Elections : श्रीगोंदा तालुक्यातील दहा ग्रामपंचायतींची रणधुमाळी सुरू झाली असून, गावातील प्रमुख नेत्यांसह कार्यकर्त्यांकडून ग्रामपंचायतीच्या निवडणूकीसाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू झाली असताना तालुक्यातील प्रमुख गावांमध्ये आपले वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, पॅनलचे नेते, गावपुढारी यांच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत.
ग्रामपंचायत निवडणूक ही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रंगीत तालीम असून, अनेक दिग्गजांसाठी ही निवडणुक प्रतिष्ठेची तर काहीसाठी अस्तित्वाची ठरणार आहे.लोकशाहीचा उत्सव म्हणून अत्यंत टोकाच्या राजकारणातून ग्रामविकासाची स्वप्न दाखविणाऱ्या ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका ५ नोव्हेंबर रोजी होणार आहेत.
तालुक्यातील अत्यंत्य संवेदनशील व मातब्बर अशा देवदैठण, लोणी व्यंकनाथ, कोळगाव, मढेवडगाव, आनंदवाडी, पेडगाव, अधोरेवाडी, टाकळी लोणार, विसापूर, घुटेवाडी, या दहा ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुका होणार असल्याने ऐन हिवाळ्यात निवडणुकीचा फड तापणार आहे.
इच्छुकांची संख्या जास्त असल्याने निवडणुका चुरशीच्या होणार असून, येणाऱ्या काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर यंदाची निवडणूक तरुणांभोवती केंद्रित होणार आहे.
सरपंच पदाची निवड जनतेमधून होणार असल्याने अनेक दिग्गजांनी सरपंच पदासाठी आग्रही भूमिका घेतली असून निवडणुकीची दिशा ठरविण्यासाठी गावागावांत घोंगडी बैठकांचे आयोजन करण्यात येत आहे.
कोणत्या प्रभागामधून कोण उभा राहणार, कोण इच्छूक आहेत. कोणाची तयारी कशी आहे. कोण उमेदवार चांगला, या बाबत जोरदार चर्चा या सर्व गावांमध्ये सुरू असून, घरोघरी राजाकरणावर चर्चा झडत आहेत.