Ahmednagar News : मुळा धरणाच्या मुळा डावा कालव्यातून पिण्याच्या पाण्यासाठी आवर्तन सोडण्याच्या आमदार लहू कानडे यांच्या प्रयत्नांना अखेर यश आले आहे. तीन दिवसांपासून मुळा धरणातून आवर्तन सोडण्यात आले आहे. आवर्तन सोडण्यात आल्याने या कालव्यावरील लाभार्थी नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहेत.
वाढत्या उन्हाळ्यात श्रीरामपूर विधानसभा मतदार संघांतर्गत राहुरी तालुक्यातील ३२ गावात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. अनके गावात पाणी योजनेच्या गावतळ्यातील पाणी संपल्याने नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.
त्यामुळे मुळा धरणातून डाव्या कालव्यात पिण्याच्या पाण्यासाठी आवर्तन सोडावे, अशी मागणी या भागातील नागरिकांनी आ. कानडे यांच्याकडे केली होती. त्यानुसार आ. कानडे यांनी पाटबंधारे विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून पिण्याच्या पाण्यासाठी आवर्तन सोडण्याबाबत सूचना केली होती. तसे लेखी पत्र संबंधित अधिकाऱ्यांना दिले होते.
पाणी सोडण्यासाठी आ. कानडे यांनी सातत्याने पाठपुरावा केल्याने मुळा डावा कालव्यातून तीन-चार दिवसांपूर्वी पिण्याच्या पाण्याची आवर्तन सोडण्यात आले आहे. या आवर्तनातून पाणी योजनेचे गावतळे भरून दिले जाणार आहेत.
राहुरी तालुक्यातील ज्या गावांच्या पाणी योजनेचे पाणी संपले असून ज्या गावांना पाणी हवे आहे. त्या गावातील ग्रामपंचायतींनी पाटबंधारे विभागाच्या देवळाली (ता. राहुरी) पाटबंधारे उपविभागीय कार्यालयाशी संपर्क साधून पाणी मागणीचे लेखी पत्र संबंधित अधिकाऱ्यांकडे द्यावेत, असे आवाहन आ. कानडे यांनी केले आहे.