अहमदनगर Live24 टीम, 30 मार्च 2022 Ahmednagar Politics :- लोकसभेची जागा भलेही भाजपकडे असली तरी विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादीचा बालेकिल्ला अशी ओळख असलेल्या अहमदनगर जिल्ह्यासाठी भाजपने मोठी खेळी केली आहे.
भाजपच्या मिशन २०२४ उपक्रमांतर्गत अहमदनगर जिल्ह्याची जबाबदारी विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर सोपविण्यात आली आहे.
आगामी निवडणुकांच्या तयारीसाठी भाजपनं मिशन २०२४ सुरू केलं आहे. त्यासाठी पक्षाच्या चौदा प्रमुख नेत्यांना जिल्हानिहाय जबाबदारी वाटप करण्यात आलं आहे.
अहमदनगर व सोलापूर जिल्ह्यासाठी फडणवीस यांची नियुक्ती करण्यात आली आहे. संबंधित नेते आपल्याला नेमून दिलेल्या जिल्ह्यांत दौरे करणार आहेत.
पुढील पंधरा दिवसांत ते दौरे सुरू होणार आहेत. राष्ट्रवादीकडून स्वत: पक्षाध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे नगरवर विशेष लक्ष ठेवून असतात.
नगर जिल्ह्यात सध्या महाविकास आघाडीचे तीन मंत्री आहेत. नगर लोकसभा भाजपकडं तर शिर्डी शिवसेनेकडं आहे. मात्र, विधानसभेत राष्ट्रवादीचे प्राबल्य आहे.
नगरची लोकसभेच्या जागा जिंकण्यासाठी राष्ट्रवादीने प्रयत्न सुरू केले असून त्यासाठी पारनेरचे आमदार नीलेश लंके यांचं नाव पुढं करण्यात आलं आहे.
या पार्श्वभूमीवर भाजपनं नगरची जबाबदारी फडणवीस यांच्याकडं सोपविली आहे. येथे सुरू असलेला विखे विरूदध अन्य नेते हा सुप्त संघर्ष मिटवून सर्वांना एकदिलाने कामाला लावताना राष्ट्रवादीला रोखण्याचे काम वरिष्ठ नेताच करू शकतो, अशी भाजपची अटकळ असावी.
शिवाय आतापर्यंत फडणवीस यांना जेथे जेथे प्रभारी म्हणून पाठविण्यात आलं होतं, तेथील निकाल पहाता नगरची आगामी निवडणुकीत राष्ट्रवादी विरूद्ध भाजप हा संघर्ष पाहण्यासारखा असणार आहे.