Shirdi News : देशातील नंबर दोनचे श्रीमंत देवस्थान असलेल्या शिर्डीतील श्री साईबाबा संस्थानच्या कर्मचाऱ्याने बनावट पावती देऊन साईबाबा संस्थान आणि देणगीदार भाविकाची फसवणूक केल्याची बाब समोर आली आहे.
या कर्मचाऱ्याविरूद्ध साईबाबा संस्थानच्या वतीने शिर्डी पोलीस ठाण्यात फसवुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके यांनी सांगितले.
याबाबत मिटके यांनी सांगितले, की शिर्डी येथील श्री साईबाबा संस्थानच्या देणगी कार्यालयात सुरू असलेल्या गैरप्रकारात साईसंस्थानचा कर्मचारी दशरथ भगवंत चासकर (रा. मलढोण, ता.सिन्नर, जि. नाशिक )
याने त्याच्या पदाचा फायदा घेत दि. ३१ ऑक्टोबर २०२२ ते १३ एप्रिल २०२३ दरम्यान त्याच्याकडे प्राप्त झालेल्या १२ हजार ६७८ रुपये रकमेची देणगीची खोटी पावती तयार करून ती खरी म्हणून साईभक्तांना देऊन त्या पैशाची अफरातफर केली.
अफरातफर करून त्याने संस्थान व साई भक्तांची फसवणूक केली आहे. यासंदर्भात साईबाबा संस्थानच्या लेखा विभागाचे खातेप्रमुख कैलास सोनाजी खराडे यांनी शिर्डी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
यावरून शिर्डी पोलीस ठाण्यात आरोपी दशरथ भगवंत चासकर याच्या विरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर ९०४ / २३ नुसार भा.दं.वि. कलम ४०८, ४६५, ४२०, ४७१ प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास शिर्डी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक एस. काळे करत आहेत.
वृद्ध, अडाणी, मध्यस्थामार्फत आलेल्या देणगी कक्षात महिन्याकाठी लाखो रुपयांची अफरातफर केली जात असल्याची चर्चा शहरात सुरू झाली आहे. याबाबत साईबाबा संस्थानचे अधिकारी आणि पोलीसांकडून चौकशी सुरू असल्याचे सांगितले जात आहे.
भाविकांकडून साईबाबा देणगी कक्षात दिलेल्या रकमेच्या दोन पावत्या बनविण्यात येत असून त्यापैकी एक पावती बनावट असल्याचे समजते. या प्रकरणामध्ये अजून कोणाचा सहभाग आहे, हे पोलिस तपासात पुढे येईलच. तोपर्यंत या प्रकरणाकडे शिर्डीसह देशविदेशातील साईभक्तांचे लक्ष लागून राहिले आहे.