Ahmednagar News : बऱ्याचवेळा ‘नाद करा पण शेतकऱ्याचा कुठं’ असं म्हटलं जात. आता एक गोष्ट अशी समोर आली आहे की ती ऐकून तुम्हीही म्हणाल शेतकऱ्याचा नाद नाय करायचा ! रविवारपासून (३१ डिसेंबर) सुरु झालेल्या
राजूर येथील बहुचर्चित डांगी जनावरांच्या प्रदर्शनात एका बैलजोडीवर तब्बल २ लाख ७१ हजार रुपयांची उच्चांकी बोली लागलीये.समशेरपूर (ता.अकोले) येथील संतोष सदगीर यांची ही बैलजोडी आहे.
या प्रदर्शनामध्ये विविध भागतून बैलजोड्या व पशुधन आणले होते. या प्रदर्शनात ठाणे, जुन्नर (पुणे), नगर, नाशिक जिल्ह्यांतून आपल्या डांगी जनावरांसह शेतकरी आले होते. मागील काही वर्षांपासून राजूर येथील डांगी जनावरांच्या प्रदर्शनाचा बोलबाला सर्वत्र झाला आहे.
चार वर्षांपासून तो स्थानिक स्वराज्य संस्थांमधील हेवेदावे व राजकारण, तसेच दोन वर्षांत कोरोना संसर्गजन्य रोगराई, लंम्पी आजारामुळे हे प्रदर्शन बंद होते. यंदा ते पुन्हा सुरू करण्याचा निर्णय राजूर ग्रामपंचायत,
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, राजूर, महाराष्ट्र राज्य कृषी विभाग व पशसंवर्धन विभाग जिल्हा परिषद, अहमदनगर यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आला. या प्रदर्शनाला मोठा प्रतिसाद मिळाला असून अनेक प्रकारचे पशुधन सहभागी झाले होते.
या प्रदर्शनात इगतपुरी तालुक्यातील धामणी येथील शेतकरी भाऊसाहेब भोसले यांचा वळू चॅम्पियन, तर अकोले तालुक्यातील सांगवी येथील धोंडीबा किसन बिन्नर यांचा वळू उपविजेता ठरला. वारंघुशी येथील बाळू लोटे यांचा दोन दाती वळू,
भाऊसाहेब भोसले (धामणी ता. इगतपुरी) यांचा चार दाती वळू, नारायण जाधव (पाडळी, ता. सिन्नर) यांचा सहा दाती वळू व आठ दाती प्रकारात विठ्ठल गंभीरे (गंभीरवाडी, ता. अकोले) यांचा व शेरणखेलचे प्रगतशील शेतकरी भागवत कासार यांची गाभण गाय हे पशुधन विविध गटातील प्रथम क्रमांकाचे विजेते ठरले.
या प्रदर्शनामध्ये आदिवासीबहुल कुटुंबांनी वर्षभरासाठी लागणारे गरम मसाले, किराणा व दैनंदिन साहित्याची खरेदी केल्याचे पाहायला मिळाले.