Ahmednagar News : पावसाळा सुरू झाला असून डासांची संख्या वाढू शकते. पाणी साठवण केलेली भांडे स्वच्छ ठेवा. आपला परिसर स्वच्छ ठेवा आणि घराभोवताली पाणी साचू देऊ नये. आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाळावा.
अंगण व परिसरातील खड्डे बुजवावेत. घरामध्ये मच्छरापासून बचावासाठी झोपताना मच्छरदाणीचा वापर करावा. सर्दी, थंडी, ताप, खोकला, अंगदुखी अशी लक्षणे आढळल्यास त्वरित जवळच्या आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा.अशा सूचना आरोग्य विभागाकडून करण्यात येत आहेत.
पावसाळा हा विविध आजारांना निमंत्रण देणारा ऋतू म्हणून ओळखला जातो. सतत पडणाऱ्या पावसामुळे डासांची उत्पत्ती वाढून हिवताप व इतर कीटकजन्य आजारांची साथ पसरण्याची भिती असते.
त्यामुळे नागरीकांनी वेळीच खबरदारी घेऊन घरासमोर किंवा शेजारी पाण्याची डबकी साचू देऊ नका, तसेच छतावरती टायर किंवा इतर पाणी साचणाऱ्या साहित्यांची त्वरीत विल्हेवाट लावावी, अन्यथा साथरोगाचा प्रादुर्भाव वाढू शकतो. यासाठी परीसरात नागरीकांनी स्वच्छता ठेवावी, असे आवाहन देखील आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणा सज्ज असून आदिवासी तसेच शहरी भागात सर्वेक्षण सुरू आहे. डासांची उत्पत्ती टाळण्यासाठी अनुषंगाने सूचना आरोग्य विभागाकडून देण्यात आल्या आहेत.
पावसाचे आगार म्हणून अकोले तालुका ओळखला जातो. परिणामी पावसाळ्यात नदीनाल्यांना पूर येतो. नागरी जीवन विस्कळीत होण्याच्या घटना यापूर्वीही घडल्याने दुषित पाण्यामुळे रोगराई व आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ शकतात. पावसाळ्यात होणाऱ्या आजारात हिवताप, डेंग्यू, चिकुनगुनिया या आजारांचा प्रादुर्भाव वाढतो.
यापैकी हिवताप प्लासमोडीअम या प्रकारच्या परोपजीवी जंतूमुळे होणारा आजार आहे. यापैकी प्लासमोडीअम पुल्सीपॅरम या प्रकारच्या जंतूमुळे होणारा हिवताप घातक ठरू शकतो. तसेचं पावसाळ्यातील जून ते सप्टेंबर या काळात हिवताप व इतर कीटकजन्य आजार होतात. या काळात कीटकजन्य आजारांचा प्रसार होतो.
तालुक्यातील अनेक भागात व शहरांचे ठिकाणी काही भागात दरवर्षी मलेरियाचे रुग्ण आढळतात. शासकीय व खासगी रुग्णालयात गर्दी वाढलेली दिसून येते. त्यामुळे पावसाळ्याची सुरुवात असल्याने ग्रामीण तसेच शहरी भागात सर्वेक्षण सुरू आहे. आणि डासांची उत्पत्ती टाळण्यासाठी अनुषंगाने आरोग्य यंत्रणेकडून सूचना देण्यात आल्या आहेत.