अहमदनगर Live24 टीम, 14 मे 2021 :-गेल्या दोन दिवसांपूर्वी अकोले तालुक्यात धान्याचा काळाबाजार करणाऱ्या चार ट्रक राजुर पोलिसांनी ताब्यात घेतल्या.
याबाबत मागणी करूनही कारवाई का झाली नाही? संबंधित वाहतूक ठेकेदारावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी माजी आमदार वैभवराव पिचड यांनी जिल्हाधिकारी यांचेकडे निवेदनाद्वारे केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, अकोले तालुक्यात रेशनिंगचे धान्य संशयास्पद घेऊन जात असताना बारी गावाजवळील घाटात चार गाड्या राजूर पोलिसांनी पकडल्या.
यावेळी पिचड यांनी स्वतः उपस्थित राहून चौकशी केली असता संबंधित गाडी चालक व पुरवठा विभागाचे कर्मचारी उडवाउडवीची उत्तरे देताना दिसून आले.
यानंतर पिचड यांनी रात्री तहसील कार्यालयात ठिय्या आंदोलन करून तात्काळ कारवाई करून गुन्हा दाखल करावा व संबंधित कर्मचार्यांची वैद्यकीय तपासणी करण्याची मागणी केली.
यावेळी तहसीलदार मुकेश कांबळे यांनी चौकशी, पंचनामा करून गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते.
मात्र घटनेला 24 तास उलटूनही कारवाई न झाल्याचे निदर्शनास आल्याने काल गुरूवारी दुपारी माजी आ. पिचड तहसील कार्यालयात येऊन तहसीलदारांना निवेदन देऊन तिव्र भावना व्यक्त केल्या. या प्रकरणात दोषी कर्मचार्यांवर कारवाई झाली पाहिजे असे मत त्यांनी व्यक्त केले.