अहमदनगर Live24 टीम, 20 नोव्हेंबर 2021 :- करोना महामारीच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्यासाठी अनेक दिवसांपासून राहाता तालुक्यातील कोल्हार भगवतीपूरच्या आठवडे बाजारास प्रतिबंध करण्यात आला होता.
कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने अखेर कोल्हार भगवतीपूरच्या दर शुक्रवारी भरणाऱ्या आठवडे बाजारास परवानगी देण्यात आली. गेल्या आठवड्यापासून येथील बाजारतळावर आठवडे बाजार भरू लागला आहे.
यामुळे जुन्या पुलावर अनधिकृत भरणाऱ्या बाजारापासून व गर्दीपासून नागरिकांची सुटका झाली आहे. येथे शुक्रवारी भरणाऱ्या आठवडे बाजारामध्ये निव्वळ कोल्हार भगवतीपूरचेच नव्हे तर आजूबाजूच्या अनेक गावांतील लोकही भाजीपाला खरेदी विक्रीसाठी येत असतात.
कोल्हार-भगवतीपूर हे राहाता तालुक्यातील गाव आणि कोल्हार खुर्द हे राहुरी तालुक्यातील गाव. दोन्ही वेगवेगळ्या तालुक्यांतील गावांच्या मध्यावर नदीपात्रावर पूल असल्याने हा बाजार कुणाच्या हद्दीत भरला हा प्रश्न अनुत्तरीत बनला.
पर्यायाने याला अटकाव कोणी करायचा हा मोठा पेच होता. त्यामुळे स्थानिक प्रशासनाबरोबरच जिल्हा व तालुका प्रशासनाच्या संबंधित खात्याने व अधिकाऱ्यांनी याकडे सपशेल कानाडोळा केला.
हीच संधी विक्रेते व बाजारकरूंच्या पथ्यावर पडली. दर शुक्रवारी येथील जुना पूल बाजारकरुंच्या गर्दीने कोंडीत सापडला होता. अखेर यावर पर्याय म्हणून गेल्या आठवड्यापासून येथील बाजारतळावर आठवडे बाजार भरू लागला आहे. यामुळे जुन्या पुलावर अनधिकृत भरणाऱ्या बाजारापासून व गर्दीपासून नागरिकांची सुटका झाली आहे.