जामखेड गोळीबार प्रकरणातील दोन आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले आहे. अक्षय ऊर्फ चिंग्या विश्वनाथ मोरे (वय 20 वर्षे रा. पाटोदा, ता.जामखेड), कुणाल जया पवार (वय 22, रा. कान्होपात्रा नगर, ता. जामखेड) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेला गावठी कट्टा व गुन्ह्यात वापरलेली इको कार ताब्यात घेण्यात आली आहे.
अधिक माहिती अशी : फिर्यादी आबेद बाबुलाल पठाण (वय 40, रा. भवरवाडी, ता. जामखेड) हे लेबर मुकादम आहेत. त्यांचेकडील मजूर लक्ष्मण कल्याण काळे यास अक्षय ऊर्फ चिंग्या मोरे याने दीड वर्षांपूर्वी मारहाण केली होती. याबाबत त्याच्यावर जामखेड पोलीस ठाण्यात येथे तक्रार नोंदवण्यात आली होती.
त्याचा राग मनात धरुन आरोपी अक्षय ऊर्फ चिंग्या मोरे याने त्याच्या साथीदारासह ३ मार्च रोजी फिर्यादीस शिवीगाळ करुन, जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने पिस्टलने गोळ्या झाडल्या. यात फिर्यादीचे उजव्या पायाचे पोटरीला दुखापत झाली होती.
ही घटना घडल्यानंतर पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना पथक नेमून गुन्ह्यातील फरार आरोपींचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घेण्याबाबत आदेशित केले होते.
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने घटना ठिकाणास भेट देत 2 दिवस घटना ठिकाण व आजुबाजूचे सीसीटीव्ही फुटेजचे आधारे आरोपींची माहिती घेतली.
आरोपी हे विंचरणा नदीजवळ काटवनात लपून बसलेले असल्याची माहिती त्यांना मिळाली. पोलीस पथकाने त्या ठिकाणी जात कारवाई केली. तेथे कुणाल जया पवार यास ताब्यात घेतले. त्याच्याकडून अक्षय ऊर्फ चिंग्या मोरे याचे बाबत माहिती घेऊन त्यास जामखेडमधून अटक केली. पुढील तपास जामखेड पोलीस करत आहेत.