Sangamner News : संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे मार्गे असलेल्या लोणी ते नांदूर शिंगोटे रस्त्यावर वेगाने जाणारी इर्टीगा कार विजेच्या सिमेंट खांबाला धडकून अपघात झाला. तळेगाव दिघे गावा दरम्यान काल मंगळवारी (दि.१९) सकाळी ७.१५ वाजेच्या सुमारास अपघाताची ही घटना घडली.
शनिशिंगणापूर येथून शनिदेवाचे दर्शन घेऊन हे पाच भाविक इर्टीका कारगाडीतून घराकडे परतत होते. दरम्यान झालेल्या या अपघातातून दोन पुरुष व तीन महिला बालंबाल बचावले. लोणी ते नांदूर शिंगोटे रस्त्याने इर्टीका गाडीतून (क्र. एमएच ०५ इक्यू ४३५५) राजेंद्र ठक्कर (रा. कल्याण) हे कल्याण येथे परतीचा प्रवास करीत होते.
भरधाव वेगाने इर्टीका तळेगाव गावादरम्यान आली असता दत्ता उर्फ नितीन दिघे यांच्या घरासमोर रस्त्याच्याकडेला असलेल्या वीजेच्या सिमेंट खांबाला धडक होऊन अपघात झाला.
त्यानंतर गाडी महेश जोर्वेकर यांच्या घराजवळील झाडाला धडकली. यावेळी घराबाहेर कुणीही नव्हते, म्हणून मोठा अपघात आणि दुर्घटना टळली आणि इर्टीका गाडीतील पाचजणही बालंबाल बचावले.
अपघातात सिमेंटचा वीज खांब तुटला. समोरून आलेल्या गाडीने हूल दिल्याने इर्टीका गाडीचा अपघात झाल्याचे चालक राजेंद्र ठक्कर यांनी सांगितले. अपघाताची माहिती समजताच ग्रामपंचायत सदस्य भाऊसाहेब दिघे, युवक कार्यकर्ते स्वप्नील दिघे यांच्यासह कार्यकर्त्यांनी घटनास्थळाकडे धाव घेत मदतकार्य केले.
संगमनेर तालुका पोलिसांना या अपघाताची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी घेवून पाहणी केली. अपघातस्थळी ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती.