Ahmednagar News : सर्वदूर पावसाने तालुक्यातील शेतकरी सुखावला असला, तरी काढणीला आलेल्या मुगाचे मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तालुक्यातील बहुतांश नद्यांतून पाणी वाहिले असून, मोठ्या तलावांत पाण्याची आवक होण्यास सुरुवात झाली आहे.अनेक छोटे तलाव, बंधारे तुटुंब भरले आहेत.
नगरला देखील मुसळधार पाऊस झाल्यामुळे सीना नदीला पहिला पूर आला. कल्याण रोडवरील अमरधामजवळील पुल या पाण्याखाली घेल्याने या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती.
शहरातून सीना नदी वाहत असून नदीच्या पात्रामध्ये मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे झाली आहेत. काही ठिकाणी मातीचे भराव टाकल्यामुळे पावसाळ्यामध्ये सीना नदीला पूर आल्यानंतर अनेक नागरिकांच्या घरात पाणी घुसले तर कल्याण राष्ट्रीय महामार्गावरील छोटा पूल पुराच्या पाण्याखाली गेला. त्यामुळे हा राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाला बंद करावा लागतो, त्यामुळे वाहतुकीची मोठी समस्या निर्माण होत आहे.
केंद्र सरकारकडून पुलाच्या कामासाठी मोठा निधी मंजूर करून घेतला असून त्याचे काम देखील सुरू आह. पुढील वर्षी या पुलाचे काम पूर्ण होणार असून त्यानंतर पावसाच्या परामळे होणाऱ्या वाहतूकबंदचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली निघणार आहे.
सीना नदीला पूर आला असून प्रशासनाच्या माध्यमातून आपत्कालीन व्यवस्था तातडीने सुरू केली असल्याचे आमदार संग्राम जगताप यांनी सांगितले. तर नगर शहरात मुसळधार पाऊस झाल्यामुळे महापालिका प्रशासनाच्यावतीने तातडीने उपयोजना करीत रस्त्यावर साचलेले पाणी काढून देण्यात आले. तसेच शहरामध्ये मुसळधार पावसामुळे पडलेले झाडे व फांद्या तातडीने उद्यान विभागाच्यावतीने हटवण्यात आल्या.
त्याचबरोबर आलेल्या पुरामुळे वाहतुकीचे मार्ग ठप्प झाले होते. त्यामुळे कोणीही पुराच्या पाण्यातून जाऊ नये, यासाठी मनपाच्या वतीने ठिकठिकाणी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली.
रात्रभर आम्ही उपयोजना केल्या असून, कुठलीही अनुचित दुर्घटना घडलेली नाही असून, सर्व प्रभाग अधिकारी यांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती आयुक्त यशवंत डांगे यांनी दिली. मुसळधार पावसामुळे सीना नदीला आलेल्या पुराची पाहणी आमदार संग्राम जगताप यांनी केली.