अहमदनगर बातम्या

नगर अर्बन बँक गैरकारभाराच्या चौकशीसाठी…

Ahmednagar News : नगर अर्बन बँकेतील गैरकारभार आणि संचालक, अधिकाऱ्यांच्या भ्रष्टाचाराची चौकशी करून दोषींवर कडक कायदेशीर कारवाई होण्यासाठी एस.आय.टी. नेमण्यात यावी. बँकेचा बँकिंग परवाना रिझर्व्ह बँकेने रद्द केल्याने ठेवीदार आपल्या ठेवी परत मिळण्यासाठी विविध यंत्रणांचे उंबरठे झिजवत आहेत.

बँकेच्या गैरकारभाराबाबत पोलिसांना फॉरेन्सिक रिपोर्ट प्राप्त होऊनही संबंधित संचालक, अधिकाऱ्यांवर कारवाई होत नाही. अशावेळी विशेष तपास पथक (एसआयटी) नेमून सदर गुन्ह्यांचा तपास करावा अन्यथा उच्च न्यायालयात दाद मागण्याचा इशारा बँकेचे जागृत सभासद राजेंद्र चोपडा यांनी दिला आहे.

चोपडा यांनी राज्याच्या पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांना सविस्तर पत्र लिहून नगर अर्बन बँकेतील घोटाळ्याप्रकरणी संबंधित संचालक, अधिकाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

चोपडा यांनी पंतप्रधान कार्यालय, केंद्रीय सहकारमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश यांनाही सदर पत्राची प्रत पाठवली आहे.

राजेंद्र चोपडा यांनी म्हटले आहे की, रिझर्व्ह बँकेने वेळोवेळी सूचना देवूनही कारभारात सुधारणा न झाल्याने ११३ वर्षांची परंपरा असलेल्या या बँकेचा बँकिंग परवाना रद्द झाला. अनेक जागरूक सभासदांनी केलेल्या तक्रारीनंतर पोलिस विभागाने औरंगाबाद हायकोर्टाच्या आदेशानुसार फॉरेन्सिक ऑडिट करून घेतले.

हा अहवाल आल्यावर आर्थिक गुन्हे शाखेचे अधिकारी कमलाकर जाधव यांनी यांनी तपास योग्य पध्दतीने चालवला असताना त्यांची अचानक नाशिक येथे बदली करण्यात आली. त्यांच्याजागी येणाऱ्या नवीन अधिकाऱ्यांना पुन्हा संपूर्ण प्रकरणाचा नव्याने अभ्यास करावा लागेल व यात फक्त वेळ मारून नेण्याचे काम होईल, अशी शक्यता आहे.

अतिरिक्त पोलिस अधीक्षक प्रशांत खैरे यांनीही या मोठ्या गुन्ह्याच्या तपासात अतिशय चांगले काम करून न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न नक्कीच केला आहे. बँकेत अनेक गोरगरीबांचे पैसे अडकलेले आहेत.

दुसरीकडे संबंधित संचालक, संशयित आरोपी नुकत्याच झालेल्या नागपूर हिवाळी अधिवेशनात सत्ताधारी नेते, मंत्र्यांच्या भेटीगाठी घेताना दिसले. त्यांच्यासोबतचे फोटो सोशल मिडियावर प्रसारित करीत होते. त्यामुळे सदर प्रकरणाच्या तपासासाठी तात्काळ विशेष तपास पथक नेमावे अशी मागणी पत्रात करण्यात आली आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts