अहमदनगर Live24 टीम, 8 जानेवारी 2021 :-केडगाव हे नगर शहराचे एक मोठे उपनगर आहे. दिवसेंदिवस या उपनगराचा विस्तार वेगाने वाढत आहे. या भागातील नागरिकांचे मुलभूत प्रश्न सोडविणे गरजेचे आहे.
रस्ते, लाईट, ड्रेनेजसह अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. हे प्रश्न सोडविण्यासाठी आमदार संग्राम जगताप यांनी केडगावच्या विकासासाठी जिल्हा नियोजन शासनाकडून १० कोटींचा निधी उपलब्ध करून द्यावा.
अशी मागणी स्थायी समितीचे सभापती मनोज कोतकर यांनी केली आहे. केडगाव अरणगाव (मेहेरबाबा मार्ग) रस्त्याची दुर्दशा झाली आहे.
हा रस्ता जिल्हा परिषद अंतर्गत येत असल्याने मनपाकडून या रस्त्याच्या विकासकामासाठी निधी उपलब्ध होत नाही. जिल्हा परिषद मुख्यकार्यकारी अधिकारी यांचेकडे वेळोवेळी पत्रव्यवहार करून पाठपुरावा केला आहे.
परंतु निधी उपलब्ध नसल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात येते. नगर दौंड महामार्गाचे काम सुरू असताना या मार्गावरील वाहतून केडगाव , अरणगाव (मेहेरबाबा ) रस्त्यावरून वळविण्यात आली होती.
या रस्त्यावरून अवजड वाहतूक मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे मोठ मोठे खड्डे पडले असून, रस्त्याची अवस्था दयनीय झाली आहे. नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
तरी या रस्त्याच्या कामासाठी लवकरात लवकर निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी आ.जगताप यांच्याकडे सभापती कोतकर यांनी केली. यावेळी आमदार जगताप यांनी सांगितले की,
लवकरच या रस्त्याची पाहणी करून शासनाकडून निधी उपलब्ध करून देवू. तसेच केडगावच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देवू असेही ते म्हणाले.