पावसाच्या अतिरिक्त वाहून जाणाऱ्या पाण्याचा व कुकडी प्रकल्पामधील पाण्याचा पुर्ण क्षमतेने वापर होऊन जल संकट कमी होण्याच्या दृष्टीने डिंभे धरण ते माणिकडोह धरण बोगद्याचे काम त्वरीत सुरू करण्यासाठी आदेश जारी करण्याची विनंती खा. नीलेश लंके यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आलेल्या पत्रात नमुद करण्यात आले आहे की, कुकडे या संयुक्त प्रकल्पाची निर्मिती पुणे, नगर व सोलापूर जिल्हयातील कायमस्वरूपी दुष्काळी असलेल्या भागातील सिंचन व पिण्याच्या पाण्याच्या पाण्यासाठी करण्यात आलेली आहे. घाटमाथ्यावर पडणा-या पावसाचे पाणी अडवून सध्यस्थितीमध्ये बांधण्यात आलेले धरण व कालवे यांचा पुरेपुर वापर होऊन कार्यक्षेत्रामध्ये सिंचन व कारखानदारीमध्ये चांगल्या प्रकारे वाढ झाली आहे.
पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही मार्गी लागलेला आहे. धरणाच्या बांधणीनंतर कुकडी प्रकल्पांतर्गत असणारे माणिकडोह धरण पाणलोट क्षेत्र कमी असल्याने पुर्ण क्षमतेने भरत नाही.त्यामुळे कुकडी डाव्या कालव्यास पाणी कमी मिळत असल्याने निदर्शनास आले आहे. माणिकडोह धरण अर्धे अधिक रिकामे राहिल्याने व डिंभे धरण प्रत्येक वर्षी पुर्ण क्षमतेने भरल्यानंतरचे पाणी बोगद्याद्वारे माणिकडोह धरणामध्ये सोडल्यानंतर पुणे, नगर, सोलापुर या जिल्हयासाठी अतिरिक्त पाणी उपलब्ध होईल व भविष्यात या भागातील जलसंकट कमी होण्यास मदत होईल असे लंके यांनी या पत्रात नमुद केले आहे.
प्रस्तावित बोगद्याच्या कामास महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या नियामक मंडळाने दि. १६ मे २००६ रोजी ठराव क्र. ४४/५ नुसार डिंभे धरणामधील २.९३७ टी एम सी अतिरिक्त पाणी डिंभे-माणिकडोह बोगद्यातून माणिकडोह धरणामध्ये साठविण्यासाठी करावयाच्या बोगद्याच्या कामास मान्यता दिलेली असल्याची माहीती आहे.
सद्यस्थितीमध्ये डिंभे माणिकडोह डाव्या कालव्याची वहन क्षमता कमी आहे. पाणी गळतीचे प्रमाण जास्त आहे. हा कालवा खालच्या बाजूस असल्याने त्यामुळे माणिकडोह धरणात पाणी सोडता येत नाही. डिंभे ते माणिकडोह बोगदा पुर्ण झाल्यानंतर सिंचन क्षमतेमध्येवाढ होउन या पाण्यावर वीज निर्मीती सुध्दा करता येणार असल्याचे खा. लंके यांनी म्हटले आहे.