Ahmednagar News : पुणतांबा येथील गोदावरीचे पात्र उजाड माळरानासारखे कोरडठाक पडले आहे. संपूर्ण पात्रात खडक दिसत असल्याने नदी ओस पडलेली आहे. परिसरातील नागरिक व जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा व चाऱ्याचा प्रश्न गंभीर झाला आहे.
राहाता तालुक्यातील पुणतांबा गावाला पौराणिक ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. गोदावरी नदी येथे उत्तर वाहिनी असल्याने महाराष्ट्राची दक्षिण काशी म्हणून पुणतांब्याची ओळख आहे. कधी काळी गोदावरी नदी बारमाही वाहात होती; परंतु काळाच्या ओघात नाशिक जिल्ह्यात विविध औद्योगिक प्रकल्प सुरू करण्यात आले, परिणामी शेतीचे पाणी कमी झाले.
बारमाही बागायत असलेली पुणतांबा परिसरातील शेती जिरायत झाली. यातून शेतकरी उद्ध्वस्त झाला. परिसरात रोजगार राहिला नाही. म्हणून १९८० व १९९०च्या दशतकात गोदावरी नदीवर कोल्हापूर टाईपच्या बंधाऱ्यांची मालिका करून पुणतांबा येथे राज्य सरकारने कोल्हापूर टाईपचा बंधारा बांधला, शेतीला मुबलक पाणी उपलब्ध होईल, असे चित्र निर्माण झाले, ते सत्यातही आले; परंतु नदीवर राजमाता अहिल्याबाई होळकर घाटापासून थेट रस्तापूर शिवारापर्यंत अनेक शेतकऱ्यांनी नदी काठावर जमिनी खरेदी करून नदी पात्रात असंख्य विहिरी खोदल्या व पाणी उचलले.
त्यामुळे वारेमाप पाणी उपसा झाला. यावर्षी फेब्रुवारीत बंधाऱ्यातील पाणी संपले. नदीपात्र उजाड झाले. दशक्रिया, अंत्यसंस्कार करतेवेळी, रक्षा विसर्जन करण्यासाठीदेखील गोदावरी नदीत पाणी शिल्लक राहिले नाही. शिवाय नदी पात्रातील गौण खनिज उत्खनन मोठ्या प्रमाणात करून नदीत पाणी साठवून ठेवण्याची क्षमता नष्ट झाली. त्यामुळे भूर्गभातील पाण्याची पातळी खाली गेली. शिवाय त्या पाण्यात क्षाराचे प्रमाण खूप वाढले आहे. हेच पाणी शेतीला पिण्यासाठी घातक ठरले आहे. यातून पर्यावरणाचा हास मोठ्या प्रमाणात होत आहे. गोदावरी नदीचे पात्र उजाड माळरानासारखे दिसत आहे.
गोदावरीचे उजाड पात्र पुढच्या पिढीकरीता विनाशाची घंटा आहे. नदीतील नैसर्गिक गौन खनिजाचा वापर वारेमाप झाला. त्यामुळे नदीपात्रात पाणी टिकून ठेवण्याची क्षमता नष्ट झाली. यातून भूजल पातळी कमी होऊन क्षाराचे प्रमाण वाढले आहे. जल संवर्धनासाठी सामाजिक भावनेतून प्रत्येक नागरीकाने स्वतःहून प्रयत्न केले पाहिजे. – अमोल सराळकर
प्रवरा नदीच्या खोऱ्यातील बंधारे भरण्यासाठी उन्हाळी आवर्तन सोडले जाते, मग गोदावरी नदीच्या पात्रातील बंधारे भरण्यासाठी उन्हाळी आर्वतन सोडत नाही? हा गोदावरी नदीच्या काठावरील शेतकरी, शेतमजूर यांच्यावर अन्याय आहे. सरकार दुटप्पी भूमिका का घेते, हेच समजत नाही. -गणेश बनकर, प्रगतशील शेतकरी
पूर्वी उन्हाळ्यात नदीच्या पात्रात कुठेही झिरा तयार केला तर शुद्धपाणी मिळत होते. आज नदी पात्रात वाळू शिल्लक राहिली नाही. त्यामुळे संपूर्ण पात्रात खडकच दिसतो. यासाठी व्यक्तिगत हितसंबध बाजुला ठेवून पुढील पिढीच्या हितासाठी प्रशासन व गावकऱ्यांनी प्रयत्न केले पाहिजे. -सुधाकर जाधव, अध्यक्ष, पुणतांबा डोणगाव बंधारा कृती समिती