Ahmednagar News : वाढत्या महागाईच्या काळात दिवसेंदिवस वैद्यकीय उपचार व औषधांचा खर्च सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर जात आहे. या पार्श्वभूमीवर सार्वजनिक रुग्णालयात चांगल्या वैद्यकीय सुविधा मिळू लागल्याने अनेकजण प्रसूतीपूर्व उपचार आणि प्रसूतीसाठी सरकारी रुग्णालयांना प्राधान्य देत आहेत.
खासगी ठिकाणच्या वाढत्या वैद्यकीय खर्चाच्या तुलनेत सरकारी रुग्णालयात मोफत प्रसूती होते. उलट सरकारच्या विविध योजणांचा लाभ मिळत आहे. त्यात आर्थिक अनुदानाचा देखील लाभ दिला जातो.
खासगी सिझरिंग वर मात्र सरकारी रुग्णालयात सिझरिंगच्या अनेक केसेस नॉर्मल करण्यावर भर देतात. त्यामुळे नागरिकांचा ओढा आता सरकारी रुग्णालयाकडे वाढला आहे.
सरकारी दवाखाना म्हटले की मोठ्या प्रमाणात अस्वच्छता, डॉक्टरांची अनुपस्थिती, औषधांचा तुटवडा, रुग्णांची हेळसांड असे दृश्य डोळ्यासमोर उभे राहते. मात्र आता हे चित्र बदलत असून सरकारी दवाखान्यात देखील चांगल्या दर्जाच्या सेवा देत असल्याचे समोर आले आहे.
नगर जिल्ह्यातील अकोला तालुका अत्यंत दुर्गम भागात असल्याने या भागात दळणवळणासह आरोग्याचा सुविधा पुरवणे अत्यंत कठीण काम आहे. मात्र या तालुक्यातील सरकारी आरोग्य व्यवस्थेने हे काम अत्यंत चांगल्या प्रकारे बजावत एप्रिल ते ऑगस्ट या पाच महिन्यांच्या काळात तालुक्यात १९९६ पेक्षा अधिक महिलांच्या सुखरूप प्रसूती झाल्या आहेत.
त्यात एकट्या अकोले ग्रामीण रुग्णालयात १२९ सिझर, तर ३६२ नॉर्मल प्रसूती अशा ४९१ सुखरूप प्रसूती झाल्या आहेत. अकोले तालुक्यातील सरकारी आरोग्य व्यवस्थेअंतर्गत ४ ग्रामीण रुग्णालये, ११ प्राथमिक आरोग्य केंद्रे, ७१ आरोग्य उपकेंद्रे व खासगी दवाखाने आहेत.
पूर्वी जेमतेम उपचार व औषधांचा मोठ्या प्रमाणात तुटवडा असल्याने रुग्णाच्या नातेवाईकांना ऐनवेळी खूप धावपळ करावी लागत असे. मात्र आता रुग्णालयात औषधांचा साठा मुबलक उपलब्ध असल्यामुळे रुग्णांना दिलासा मिळाला आहे.
तीन महिन्यांपूर्वी या ग्रामीण रुग्णालयाची दररोजची बाह्यरुग्ण संख्या कमी होती, मात्र पावसाळा सुरू झाल्यापासून या भागात साथीच्या आजारांनी मोठ्या प्रमाणात थैमान घातले आहे. त्यामुळे बाह्यरुग्ण संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे.