Ahmednagar News : माजी मंत्री बाळासाहेब थोरात व महसूलमंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यातील राजकीय संघर्ष सर्वाना माहीतच आहे. मागील काही दिवसांपासून हा संघर्ष वाढत आहे. नुकतीच आश्वी येथे झालेल्या कार्यामात आमदार थोरात यांनी विखे यांच्यावर टीका केली होती. या नंतर तलाठीपदी निवड झालेल्या सर्व बांधवांना नियुक्ती पत्र वाटपाच्या कार्यक्रमात मंत्री विखे यांनी थोरात यांच्यावर टिकाश्र सोडले आहे.
पूर्वी माजी मंत्र्यांच्या काळात तहसीलदार, प्रांताधिकारी यांच्या बदल्यांसाठी रेट कार्ड होते. राज्यात आज पहिल्यांदा पारदर्शक भरती झाली. नायब तहसीलदार, तहसीलदार, प्रांताधिकारी, अपर जिल्हाधिकारी यांच्या पदोन्नत्या पारदर्शक झाल्या आहेत.
ज्यांच्या दिव्याखाली अंधार आहे. ज्यांचे हात भ्रष्टाचाराने बरबटलेले आहेत, त्यांनी दुसऱ्यावर आरोप करण्यापूर्वी आपण काचेच्या घरात राहतो याचे भान ठेवावे. असा टोला महसूलमंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचे नाव न घेता लगावला.
पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते शनिवारी जिल्ह्यात नव्याने सरळसेवेने निवड झालेल्या तलाठ्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले. त्या कार्यक्रमानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले कि, राज्यात पहिल्यांदाच पारदर्शकपणे तलाठी भरती प्रक्रिया पार पडली आहे.
माजी महसूलमंत्री भ्रष्टाचाराचे आरोप करतात. त्यांनी शिर्डीत येऊन साईबाबांची शपथ घेऊन भ्रष्टाचार झाल्याचे सांगावे. किंवा तसे एखादे उदाहरण दयावे, भ्रष्टाचार झाल्याचे आढळल्यास मी राजकारण सोडून देईल. परंतु जर त्यांनी केलेले आरोप सिद्ध झाले नाही, तर त्यांनी राजकारणातून बाजूला व्हावे, असे आव्हान देखील पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचे नाव न घेता दिले.
दरम्यान माजी महसूलमंत्री यांच्याकडून तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप झाला होता. त्यावर विभागातर्फे कारवाई करण्याचा निर्णय झाला होता. आज मला समाधान वाटते. या संपूर्ण आरोपाला उत्तर म्हणून तलाठीपदी निवड झालेल्या सर्व बांधवांना नियुक्ती पत्र देऊन आरोप करणाऱ्यांना एकप्रकारे चपराक दिली आहे.
भरती प्रक्रियेसंदर्भात विरोधकांकडून वारंवार बदनाम करण्यात आले. पण सरकारचा पारदर्शक कारभार असल्याने त्यांची डाळ शिजली नाही. राज्यात पहिल्यांदा तलाठी भरती प्रक्रिया पारदर्शकपणे झाली. असेही मंत्री विखे म्हणाले.