अहमदनगर Live24 टीम, 01 फेब्रुवारी 2021:-कोरोना संसर्गाच्या काळात स्थगित करण्यात आलेला लोकशाही दिन आजपासून पूर्ववत सुरु झाला.
प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी आयोजित करण्यात येणारा हा उपक्रम आज जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे आयोजित करण्यात आला.
जिल्हाधिकारी डॉ. राजेन्द्र भोसले यांनी यावेळी लोकशाही दिनात आलेल्या तक्रारदारांशी संवाद साधत त्यांच्या तक्रारींचे तातडीने निराकरण करण्याच्या सूचना संबंधित यंत्रणेला दिल्या.
प्रशासकीय पातळीवर दाद मागितल्यानंतर त्याची तात्काळ दखल घेत कार्यवाही करण्याच्या सूचना प्रत्यक्ष जिल्हाधिकारी यांनीच दिल्याने तक्रारदारांच्या चेहर्यावरही समाधानाचे भाव उमटले.
तब्बल ९-१० महिन्यांनंतर आज प्रथमच लोकशाही दिन उपक्रम आयोजित करण्यात आला. यासाठी अपर जिल्हाधिकारी पी. एल. सोरमारे, निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित यांच्यासह विविध यंत्रणांचे प्रमुख उपस्थित होते.
सुरुवातीला यापूर्वी आलेल्या तक्रारींचा आढावा जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी घेतला. संबंधित विभागांनी त्यांच्याकडे तक्रार प्राप्त झाल्यानंतर त्याचा जलदगतीने निपटारा करण्याचा आणि त्याचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर करण्याच्या सूचना दिल्या.